EPF Pension : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्तीनंतर ईपीएफ पेन्शन मिळते. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत वयाच्या ५० व्या वर्षी देखील पेन्शन मिळण्यास सुरुवात होऊ शकते. त्यासाठी १० वर्षे नोकरीसारख्या काही अटी पूर्ण कराव्या लागतात.
एखाद्या सदस्यानं अद्याप सेवेत १० वर्षे पूर्ण केलेली नाहीत आणि त्यापूर्वीच तो अपंग झाला आहे. मग तो पेन्शनसाठी पात्र ठरेल का? किंवा वयाची पन्नाशी ओलांडण्याआधीच एखाद्या सदस्याचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मागे असलेल्या कुटुंबीयांना पेन्शन मिळतं का? या दोन्ही काल्पनिक प्रश्नांचं उत्तर 'होय' असं आहे. अशी अनेक प्रकारची उदाहरणं किंवा अडचणी असू शकतात. त्यामुळंच ईपीएफओनं काही नियमांची यादी केली आहे आणि त्यांना सात व्यापक श्रेणींमध्ये ठेवलं आहे.
निवृत्तीनंतरचं पेन्शन : सेवेत १० वर्षे पूर्ण केलेल्या किंवा ५८ वर्षे पूर्ण झालेल्या ग्राहकांना ही पेन्शन दिली जाते.
लवकर पेन्शन : ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या, सेवेची १० वर्षे पूर्ण केलेल्या आणि नंतर ईपीएफची सुविधा नसलेल्या संस्थेत सामील होण्यासाठी नोकरी सोडलेल्या ग्राहकांना लवकर पेन्शन दिली जाते. ते एकतर ५० व्या वर्षी लवकर पेन्शन घेण्यास सुरुवात करू शकतात किंवा पूर्ण पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी ५८ व्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करू शकतात. मात्र अशा प्रकारे लवकर पेन्शन घेणाऱ्या मिळणारी रक्कम प्रत्येक वर्षासाठी ४ टक्क्यांनी कमी असते.
वय | निवृत्ती वेतन (रक्कम रुपयांत) |
५८ वर्षे | १०.००० |
५७ वर्षे | ९,६०० (१०,००० पेक्षा ४ टक्के कमी ) |
५६ वर्षे | ९,२१६ (९,६०० पेक्षा ४ टक्के कमी) |
(स्त्रोत : ईपीएफओचे यूट्यूबवरील अधिकृत चॅनेल)
अपंगत्व पेन्शन : सेवेदरम्यान अपंग (तात्पुरते किंवा कायमस्वरूपी) झालेल्या ईपीएफओ सदस्यांना ही पेन्शन दिली जाते. या पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी किमान वय (५० किंवा ५८) किंवा १० वर्षे सेवेची अट नाही. एखाद्या सदस्यानं एक महिन्याचं ईपीएफ योगदान दिलं असेल तरी तो या श्रेणीतील ईपीएफओ पेन्शनसाठी पात्र ठरतो.
विधवा किंवा बाल पेन्शन : ईपीएफ सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याची विधवा पत्नी आणि २५ वर्षांखालील दोन मुले मिळून पेन्शनसाठी पात्र ठरतात. पहिलं मूल २५ वर्षांचं झाल्यावर तिसरं मूलही पेन्शनसाठी पात्र ठरतं आणि पहिलं पेन्शनसाठी अपात्र ठरतं. सदस्याच्या मृत्यूनंतर जोपर्यंत केवळ दोन मुलांना (२५ वर्षांखालील) पेन्शन मिळत आहे, तोपर्यंत चौथ्या मुलाच्या बाबतीतही हीच प्रक्रिया सुरू राहील. या प्रकरणातही वयाची किंवा किमान सेवेची अट नाही. सदस्यानं एक महिन्याचं योगदान दिलेलं असलं तरी मृत्यू झाल्यास पत्नी आणि मुलं पेन्शन घेण्यास पात्र ठरतात.
अनाथ पेन्शन : जेव्हा एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो आणि त्याची पत्नीही हयात नसेल तर त्यांच्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या दोन्ही मुलांना पेन्शन मिळतं. मोठं मूल २५ वर्षांचं झाल्यानंतर हे पेन्शन बंद होतं.
नॉमिनी पेन्शन : ग्राहकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी पेन्शन घेण्यास पात्र ठरते आणि ते कोणाला मिळणार हे ईपीएफओ पोर्टलवर ग्राहकानं भरलेल्या ई-नॉमिनेशन फॉर्मवरून ठरतं.
आश्रित पालकांचे पेन्शन :एखादा नुकताच मृत्यू झालेला ईपीएफओ सदस्य अविवाहित असल्यास त्याच्यावर अवलंबून असलेले वडील पेन्शनसाठी पात्र ठरतात. वडिलांनंतर सदस्याची आई पेन्शन घेण्यास पात्र ठरते. पेन्शन मिळण्याचा त्यांचा हक्क आयुष्यभर कायम राहणार आहे. त्यासाठी फॉर्म १० डी भरणं अपेक्षित आहे.
संबंधित बातम्या