Enviro Infra Share Price : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर काम करणाऱ्या व त्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्सचा आयपीओ आज, शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची दमदार लिस्टिंग झाली आहे. बीएसईवर हा शेअर १४८ रुपयांच्या आयपीओ किमतीच्या तुलनेत ४७.३० टक्क्यांनी वधारून २१८ रुपयांवर सूचीबद्ध झाला. एनएसईवर हा शेअर ४८ टक्के प्रीमियमसह २२० रुपयांवर लिस्ट झाला.
एन्व्हायरो इन्फ्राचा आयपीओ २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि तीन दिवसांत जवळपास ८९.९० पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या शेअर विक्रीत ३,०७,९३,६०० शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत २,७६,८३,१३,७४७ शेअर्ससाठी बोली लागली होती. हा आयपीओ पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीत १५७.०५ पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत १५३.८० पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांचा हिस्सा २४.४८ पट सब्सक्राइब झाला.
एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्सनं गुरुवारी अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे १९५ कोटी रुपये गोळा केले होते. ६५० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी १४० ते १४८ रुपये प्रति शेअर किंमत निश्चित करण्यात आली होती. कंपनीच्या आयपीओमध्ये ३.८७ कोटी इक्विटी शेअर्सचा नवा इश्यू आणि प्रवर्तकांनी ५२.६८ लाख शेअर्सची ऑफर फॉर सेल (ओएफएस) यांचा समावेश होता.
आयपीओच्या माध्यमातून जमा झालेल्या १८१ कोटी रुपयांचा वापर कंपनी वर्किंग कॅपिटलच्या गरजा भागविण्यासाठी करणार आहे. तसंच, काही निधी १०० कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा इथं दररोज ६० दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यासाठी कंपनीची उपकंपनी ईएल मथुरा इन्फ्रा इंजिनीअर्समध्ये ३० कोटी रुपये ओतले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, एक भाग सामान्य कॉर्पोरेट कामकाजावर खर्च केला जाईल.