IT Sector Jobs: अमेरिका आणि युरोप मध्ये मंदी येण्याची भीती असल्याने भारतीय आयटी कंपन्या पुढील आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २०२४) कॅम्पस प्लेसमेंट आणि एंट्री-लेव्हल हायरिंगमधील उमेदवारांच्या नियुक्त्यांचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शक्यता आहे . या मंदीच्या भीतीपोटी कंपन्यांनी नोकरभरती आणि ऑनबोर्डिंग प्रक्रियेचा वेग आधीच कमी केला आहे. हे वृत्त 'मिंटने दिले आहे.
सॉफ्टवेअर मार्केट मजबूत असल्याचे संकेत असूनही, भारतीय टेक कंपन्यांना नोकऱ्या सोडून जाणाऱ्यांचे वाढते प्रमाण आणि अत्यल्प नफ्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम फ्रेशर्सच्या नियुक्तीवर होण्याची शक्यता आहे, असे या वृत्तात म्हटले आहे .
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून इन्फोसिस ५० हजार उमेदवारांना नोकरी देईल, अशी शक्यता आहे. विप्रो आणि टीसीएस अनुक्रमे ३० हजार आणि ४० हजार लोकांना कामावर ठेवण्याची शक्यता आहे. टेक महिंद्रा लिमिटेड १५ हजार जणांची आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ४५ हजार लोकांची नियुक्त करेल,असे मिंटच्या बातमीत नमूद केले आहे,
सहा महिन्यांपूर्वी ऑफर लेटर पाठवलेल्या अनेकांना अद्याप कामावर रुजू होण्याची तारीख मिळालेली नाही. कोविड-१९ साथीच्या आजाराच्या अनेक लाटांनंतर आर्थिक घडामोडींचा वेग वाढत असताना फेब्रुवारी २०२२ पूर्वी नोकरीच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. तथापि, रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका उडाला. इतकेच नव्हे तर पुरवठा साखळीच्या समस्याही वाढल्या आहेत. महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, कंपन्यांनी डिजिटलायझेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले . यामुळे अधिक भरती होऊ शकली आणि पगारही वाढले.
आता, लॉकडाऊन निर्बंध हटवण्यात आल्याने, कंपन्या कंपनीच्या नफ्याच्या वाढीसाठी इतर प्रकल्पांमध्ये वरिष्ठ कर्मचारी नेमण्याच्या टप्प्यावर आहेत. "आर्थिक वर्ष २०२२ मध्ये, आय टी आणि आयटी सक्षम सेवा क्षेत्रात सुमारे ४७०, ००० कर्मचारी ऑनबोर्ड होते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आम्ही ३,५०, ००० लोक असतील, असा अंदाज वर्तवला आहे. परंतु आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मंदी कायम राहिल्यास संख्या कमी होईल. परंतु ती आर्थिक वर्ष २०२३ च्या समान पातळीवर असेल," असे हॅन डिजिटल या टेक रिक्रूटमेंट फर्मचे संस्थापक,सरन बालसुंदरम यांनी 'मिंट' ला सांगितले.
संबंधित बातम्या