निवडणूक जिंकले डोनाल्ड ट्रम्प, फायदा झाला अब्जाधीश इलॉन मस्क यांना! कसा आणि किती? पाहा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  निवडणूक जिंकले डोनाल्ड ट्रम्प, फायदा झाला अब्जाधीश इलॉन मस्क यांना! कसा आणि किती? पाहा!

निवडणूक जिंकले डोनाल्ड ट्रम्प, फायदा झाला अब्जाधीश इलॉन मस्क यांना! कसा आणि किती? पाहा!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 12, 2024 11:25 AM IST

Elon Musk new worth : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा सर्वात मोठा फायदा जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांना झाला आहे.

ट्रम्प रशिया-युक्रेन संघर्ष कसा थांबवतील इलॉन मस्क यांनी आखली योजना वाचा टॉप 5 बातम्या
ट्रम्प रशिया-युक्रेन संघर्ष कसा थांबवतील इलॉन मस्क यांनी आखली योजना वाचा टॉप 5 बातम्या (REUTERS)

Elon Musk New worth : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर सर्वाधिक फायदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना झाला आहे. मस्क यांच्याकडं डॉलरचा पूर आला आहे. मस्क यांच्या संपत्तीत अवघ्या ८ दिवसांत ७३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीच्या १२ पट आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांच्याकडं ८ दिवसांपूर्वी २६२ अब्ज डॉलरची संपत्ती होती. ती आता ३३५ अब्ज डॉलर (२५,३२,३३१.५४ कोटी रुपये) वर पोहोचली आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्समध्ये डोनाल्ड ट्रम्प ४८८ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६.४ अब्ज डॉलर आहे.

ट्रम्प यांनी केलं होतं मस्क यांचं कौतुक

इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सोमवार ११ नोव्हेंबर रोजी २०.८ अब्ज डॉलरची वाढ झाली. याआधी बुधवारी त्यांच्या संपत्तीत २६.५ अब्ज डॉलरची वाढ झाली होती. विजयानंतर ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांचं तोंडभरू कौतुक केलं होतं. आपल्याकडं एक नवा रॉकस्टार असल्याचं ट्रम्प म्हणाले. मस्क यांनी माझ्यासोबत दोन आठवडे प्रचार केला. यावेळी मी अंतराळात पाठवलेल्या त्यांच्या रॉकेटबद्दल माहिती घेतली. ते रॉकेट खूप जबरदस्त आहे. मी मस्क यांच्यावर खूप प्रेम करतो, ती एक अद्भुत व्यक्ती आहे, असं ट्रम्प म्हणाले होते. 

इलॉन मस्क यांची वर्षाची कमाई किती?

इलॉन मस्क यांची यंदाची कमाई अदानी किंवा अंबानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे. इलॉन मस्क हे जगातील नंबर वन श्रीमंत तर आहेतच, पण यंदाच्या कमाईतही ते नंबर वन आहेत. मस्क यांच्या संपत्तीत या वर्षी आतापर्यंत १०५ अब्ज डॉलरची वाढ झाली असून अदानी यांच्या ९०.७ अब्ज डॉलर आणि मुकेश अंबानी यांच्या ९६.२ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ही संपत्ती खूपच जास्त आहे. यंदाच्या कमाईत एनव्हिडियाचे मालक जेन्सन हुआंग दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांची कमाई ८२.८ अब्ज डॉलर आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत हुआंग हे १२७ अब्ज डॉलरसह ११ व्या स्थानावर आहे.

लॅरी एलिसन यांनीही या वर्षी आपल्या संपत्तीत ८०.७ अब्ज डॉलरची भर घातली आहे. यामुळे ते ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्समध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २०४ अब्ज डॉलर आहे. त्याखालोखाल मार्क झुकेरबर्ग या वर्षी ७८.४ अब्ज डॉलर्सची कमाई आणि २०६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अब्जाधीशांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

अब्ज डॉलर्स म्हणजे किती रुपये?

एक अब्ज म्हणजे १०० कोटी. मस्क यांच्याकडे सध्या ३३५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ३०० बिलियन डॉलर म्हणजे ३०० अब्ज डॉलर. त्याचे कोट्यवधींमध्ये रूपांतर केले तर ३००*१०० = ३०००० दशलक्ष डॉलर्स येतात. आता ८४.४१ रुपये प्रति डॉलर या दराने त्याचे रूपांतर रुपयात केले तर ते ३००००*८४.४१=२५,३२,३३१.५४ कोटी रुपये आहे.

Whats_app_banner