अमेरिकेतील 'टेस्ला' आणि ‘स्पेस एक्स’ या कंपन्यांचा मालक असलेला अब्जाधिश उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) याने भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची माफी मागितली आहे. गोयल हे सध्या चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून दौऱ्यादरम्यान कॅलिफॉर्नियात जाऊन ‘टेस्ला' फॅक्ट्रीला भेट दिली असता मस्कसोबत त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यावर मस्क याने गोयल यांची माफी मागितली.
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलॉन मस्क याचा क्रमांक लागतो. मस्क यांनी पूर्वीची ट्विटर (Twitter), आत्ताची एक्स (X) ही कंपनी खरेदी करून धमाल उडवून दिली होती. शिवाय भविष्यात टेस्ला (Tesla) कंपनीच्या कारचे भारतात उत्पादन करण्याचा मनोदय एलॉन मस्क यांनी दोन वर्षांपूर्वी बोलून दाखवला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल हे अमेरिकेच्या कॅलिफॉर्निया प्रांतात फ्रेमॉंट शहरात जाऊन टेस्लाचा कारखाना पहायला गेले होते. परंतु गोयल यांच्या भेटीदरम्यान मस्क हे तेथे अनुपस्थित होते. तब्येतीच्या कारणास्तव एलॉन मस्क यांना कॅलिफॉर्नियातील फॅक्टरीमध्ये पोहचता आले नव्हते. त्याबद्दल मस्क यांनी गोयल यांची माफी मागितली आहे.
टेस्ला फॅक्ट्रीला भेट दिल्यानंतर मंत्री पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर भेटीचे फोटो पोस्ट केले. ‘आज फ्रेमॉंट येथील टेस्लाच्या फॅक्ट्रीला भेट दिली. कंपनीत वरिष्ठ पदांवर कार्यरत प्रतिभावंत भारतीय इंजिनियर आणि फायनान्स प्रोफेशल्सना भेटून अत्यानंद झाला. ‘टेस्ला’च्या विकासामध्ये ते महत्वाचं योगदान देत आहेत, याचा आनंद झाला. टेस्लाच्या इलेक्ट्रीक वाहन निर्मितीसाठी (EV) लागणाऱ्या सुट्या भागांच्या पुरवठादारांमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. आगामी काळात पुरवठादारांची ही संख्या दुप्पट होणार आहे. एलॉन मस्कसारख्या सळसळत्या व्यक्तिमत्वाची अनुपस्थिती जाणवली. त्यांची तब्येत लवकर बरी होण्याची कामना करतो.’ असा संदेश पियुष गोयल यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता.
वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री एलॉन मस्क यांनी ट्विटरवर संदेश पोस्ट केल्यानंतर एलॉन मस्क यांनी त्याला उत्तर दिलं. ‘तुमचं ’टेस्ला' फॅक्ट्रीला भेट देणं हे आमच्यासाठी सन्मानजनक आहे. आज कॅलोफॉर्नियाला येऊ शकलो नाही, याबद्दल क्षमस्व. परंतु भविष्यात नक्कीच भेटू या' अशी पोस्ट मस्क यांनी एक्सवर केली.
संबंधित बातम्या