Elon Musk annual salary package : यात विश्वास न बसण्यासारखं काही नाही, पण ही बातमी नक्कीच तुमचे-आमचे डोळे पांढरे करायला लावणारी आहे. ही बातमी आहे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांच्या पगाराची.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क यांच्या वार्षिक पगाराच्या पॅकेजला त्यांच्या कंपनीच्या शेअरहोल्डर्सनी अखेर मंजुरी दिली आहे. त्यानुसार इलॉन मस्क यांना वर्षाला ५६ अब्ज डॉलर इतका पगार मिळणार आहे. भारतीय चलनात त्याचं रूपांतर केल्यास ही रक्कम ४.६७ लाख कोटी रुपये होईल. टेस्लाच्या बहुसंख्य गुंतवणूकदारांनी मस्क यांनी हे पॅकेज देण्यास मान्यता दिली आहे.
स्वत:च्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर मस्क यांनीच ही माहिती दिली. तसंच, पॅकेजला मान्यता दिल्याबद्दल शेअरहोल्डर्सचे आभारही मानले.
इलॉन मस्क यांच्या वेतन कराराला मिळालेली मंजुरी हा अमेरिकेच्या कॉर्पोरेट इतिहासातील एक मोठा मैलाचा दगड मानला जात आहे. सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या काळात हा वेतन करार मस्क यांना बळ देणारा व त्यांची टेस्लाशी असलेली दीर्घकालीन बांधिलकी अधिक घट्ट करणारा ठरणार आहे. टेक्सासमधील टेस्लाच्या मुख्यालयात आज मतदानाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
इलॉन मस्क यांनी २०१८ सालीच या पॅकेजचा प्रस्ताव आणला होता. मात्र, त्याला कडाडून विरोध झाला. हे प्रकरण न्यायालयात गेलं. डेलावेअर कोर्टानं त्यास स्थगितीही दिली होती.
ग्लास लुईस अँड इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेस (आयएसएस) सारख्या प्रमुख प्रॉक्सी कंपन्या, नॉर्वे सॉव्हरेन वेल्थ फंड आणि अमेरिकेतील प्रमुख पेन्शन फंड यांचा मस्क यांच्या या वेतनकरारास विरोध होता. मात्र, छोट्या गुंतवणूकदारांवर असलेल्या मस्क यांच्या प्रभावामुळं त्यांचं पारडं जड झालं आणि हा करार मंजूर झाल्याचं बोललं जातं.
इलॉन मस्क यांच्या वेतन कराराबरोबरच शेअरहोल्डर्सनी टेस्लाच्या कायदेशीर मुख्यालयाचे स्थलांतर आणि संचालक मंडळाच्या सदस्यांची पुन्हा निवड यासह महत्त्वपूर्ण कॉर्पोरेट निर्णयांवर देखील मतदान केलं. यावरून कंपनीतील व्यापक धोरणात्मक बदल अधोरेखित झाले आहेत.
इलॉन मस्क यांनी या वेतन कराराबद्दल समाधान व्यक्त केलं. मी सुरुवातीपासूनच आशावादी होतो. मी आशावादी नसतो तर ह्या कंपनीचा जन्मच झाला नसता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मस्क यांच्या आईनंही गुंतवणूकदारांचे आभार मानले आहेत. इलॉन मस्क यांची सध्याची संपत्ती २०७ अब्ज डॉलर इतकी आहे.
संबंधित बातम्या