Ola Electric Share Price : ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स मंगळवारी व्यवहारादरम्यान चर्चेत होते. इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्या कंपनीच्या शेअरमध्ये आज ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आणि हा शेअर ७६.६१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठं कारण आहे. ओला इलेक्ट्रिकचा तीन महिन्यांचा म्हणजेच ९० दिवसांचा अँकर लॉक-इन कालावधी आज संपला.
तीन महिन्यांचा अँकर लॉक-इन कालावधी संपल्याने अँकर गुंतवणूकदारांनी लॉक केलेले १८.१८ कोटी ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स आता बाजारात ट्रेडिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र, हा लॉक-इन कालावधी संपल्याने हे सर्व शेअर्स विकले जातील, असे नाही. हे शेअर्स केवळ ट्रेडिंगसाठी पात्र आहेत. यापूर्वी ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सचा ३० दिवसांचा अँकर लॉक-इन कालावधी ९ सप्टेंबर रोजी संपला होता.
नियमांनुसार, आयपीओमध्ये अँकर गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले शेअर्स लॉक-इन कालावधीत असतात. अँकर गुंतवणूकदारांना देण्यात आलेले एकूण ५० टक्के समभाग ३० दिवसांसाठी लॉक केले जातात आणि उर्वरित ५० टक्के समभाग वितरणाच्या तारखेपासून ९० दिवसांसाठी लॉक केले जातात.
ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ २ ऑगस्ट २०२४ रोजी लाँच करण्यात आला आणि इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्मात्याने प्राथमिक बाजारातून ६,१४५.५६ कोटी रुपये उभे केले. इश्यू उघडण्याच्या एक दिवस आधी ओला इलेक्ट्रिकने आयपीओसाठी प्रति शेअर ७६ रुपये प्रति शेअर या वरच्या किमतीच्या बँडवर विविध देशी-विदेशी संस्थांना ३६.३५ कोटी शेअर्स चे वाटप करून अँकर गुंतवणूकदारांकडून २,७६३ कोटी रुपये उभे केले होते. ओला इलेक्ट्रिकच्या शेअरने ९ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात निराशाजनक सुरुवात केली होती. एनएसईवर ओला इलेक्ट्रिकचा शेअर ७६ रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाला, तर आयपीओचा भाव ७६ रुपये प्रति शेअर होता. बीएसईवर ओला इलेक्ट्रिकचा शेअर ०.०१ टक्के पडून ७५.९९ रुपयांवर लिस्ट झाला.
लिस्टिंगच्या आठवडाभरातच कंपनीच्या शेअर्सनी दमदार परतावा दिला. ओला इलेक्ट्रिकच्या शेअरचा भाव २० ऑगस्ट रोजी १५७.५३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. म्हणजे १०८ टक्के परतावा. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने सोमवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शुक्रवारी, ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये कंपनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध्या वर्षाचे निकाल जाहीर करणार आहे.