अवघ्या १५ दिवसांत ३ रुपयांपासून ते ३ लाखांचा टप्पा ओलांडणारा एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा शेअर आता घसरत चालला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. सोमवार प्रमाणेच आजही हा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २९८२५२.२५ रुपयांवर आला आहे. त्यामुळं दोन दिवसांत शेअरमध्ये ३४१४७ रुपयांची घसरण झाली आहे. ८ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअरनं ३,३२,३९९.९५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. तर, शेअरचा नीचांकी भाव ३.५३ रुपये आहे.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअर्समध्ये अचानक वादळी वाढ झाली आहे. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी एकाच दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ६६९२५३५ टक्के वाढ झाली. एकाच दिवसात कंपनीचा शेअर ३.५३ रुपयांवरून २,३६,२५० रुपयांवर पोहोचला. मुंबई शेअर बाजारात झालेल्या विशेष कॉल लिलावानंतर एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या तेजीनंतर एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स एमआरएफला मागे टाकत देशातील सर्वात महागडा शेअर ठरला.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स कंपनीची भारतीय रिझर्व्ह बँकेकडे गुंतवणूक कंपनी श्रेणीअंतर्गत एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) म्हणून नोंद आहे. कंपनीचा सध्या स्वत:चा कोणताही ऑपरेशनल व्यवसाय नाही. पण, एशियन पेंट्ससारख्या अनेक बड्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत त्याच्या होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश आहे. कंपनीची गुंतवणूक ११ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. एशियन पेंट्समध्ये एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा २.९५ टक्के हिस्सा असून त्याची किंमत ८,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंटकडे केवळ २,००,००० शेअर्सचा इक्विटी बेस आहे, त्यापैकी १,५०,००० शेअर्स प्रवर्तकांकडे आहेत. एल्सिड इन्व्हेस्टमेंटचे मार्केट कॅप मंगळवारी ५९६५.०५ कोटी रुपयांवर पोहोचले.