Elcid Investments Q2 Results : देशातील सर्वात महागडा ठरलेला एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा शेअर आपला हा नंबर गमावतो की काय अशी शंका आता येऊ लागली आहे. कारण, गेल्या चार दिवसांपासून हा शेअर सातत्यानं घसरत असून या कालावधीत त्यात तब्बल ६०००० रुपयांची घसरण झाली आहे.
सलग चार दिवसांपासून एल्सिडच्या शेअरला ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागत आहे. याचा अर्थ या शेअरला एकही खरेदीदार मिळेनासा झाला आहे. चार दिवसांत हा शेअर ६० हजार रुपयांनी घसरला आहे. २९ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमत अचानक २ लाख ३६ हजार रुपयांवर पोहोचली आणि एमआरएफला मागे टाकत हा देशातील सर्वात महागडा शेअर ठरला. तेव्हापासून हा शेअर सातत्याने वाढत जाऊन सव्वा तीन लाखांच्याही पुढं गेला होता.
मुंबई शेअर बाजारात २९ ऑक्टोबर रोजी शेअरची किंमत जाणून घेण्यासाठी विशेष कॉल लिलाव आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी अल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या शेअरनं ट्रेडिंगदरम्यान २,३६,२५० रुपयांचा भाव गाठला. स्पेशल कॉल लिलावापूर्वी हा शेअर बीएसईवर २१ जून २०२४ रोजी ३.५३ रुपयांवर बंद झाला होता. आता कंपनीनं चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
अल्सिड इन्व्हेस्टमेंट्सने सप्टेंबर तिमाहीत ४३.४७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तो १७९.३७ टक्क्यांनी जास्त आहे. इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपनीचा महसूल १४९.६२ टक्क्यांनी वाढून ५६.३४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १५.५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि २२.५७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. या तिमाहीत कंपनीला लाभांशातून मिळणारं उत्पन्न १९.४७ टक्क्यांनी वाढून २.२७ कोटी रुपये झालं आहे. त्याचं व्याज उत्पन्न ५७.३५ टक्क्यांनी वाढून ७.२७ लाख रुपये झालं आहे.
ही कंपनी गुंतवणूक कंपनी श्रेणीअंतर्गत आरबीआयकडे नोंदणीकृत एनबीएफसी आहे. सध्या कंपनीचा स्वत:चा कोणताही ऑपरेटिंग बिझनेस नसला तरी एशियन पेंट्स सारख्या इतर बड्या कंपन्यांमध्ये कंपनीची बरीच गुंतवणूक आहे. होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश हा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. कंपनीची गुंतवणूक ११,००० कोटी रुपयांहून अधिक असून मार्केट कॅप ५,६६६.७९ कोटी रुपये आहे.