byju news : बायजूसचे संस्थापक रवींद्रन गोत्यात; देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून ईडीचं मोठं पाऊल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  byju news : बायजूसचे संस्थापक रवींद्रन गोत्यात; देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून ईडीचं मोठं पाऊल

byju news : बायजूसचे संस्थापक रवींद्रन गोत्यात; देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून ईडीचं मोठं पाऊल

Feb 22, 2024 01:44 PM IST

Byju founder Raveendran News : ‘बायजूस’चे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्याची मागणी ईडीनं केली आहे.

File image of Byju’s founder Byju Raveendran.
File image of Byju’s founder Byju Raveendran. (Mint )

Byju founder Raveendran News : अल्पवाधीतच देशभरात लोकप्रिय ठरलेल्या 'बायजूस' या शैक्षणिक अॅपचे संस्थापक व सीईओ बायजू रवींद्रन भलतेच गोत्यात आले आहेत. रवींद्रन यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस काढण्याची विनंती सक्तवसुली संचालनालयानं (ED) इमिग्रेशन विभागाकडं केली आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचं (FEMA) उल्लंघन केल्याप्रकरणी सध्या ‘बायजू’चे संस्थापक रवींद्रन यांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या बेंगळुरू कार्यालयाकडून ही चौकशी केली जात आहे. ही चौकशी सुरू असतानाच ईडीनं रवींद्रन यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. यासाठी ईडीनं या महिन्याच्या सुरुवातीला ब्यूरो ऑफ इमिग्रेशनशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. 

ईडीच्या कोची कार्यालयाच्या विनंतीवरून रवींद्रन यांच्या विरोधात दीड वर्षापूर्वी लूकआऊट नोटीस काढण्यात आली होती. मात्र, नंतर हा तपास बेंगळुरू कार्यालयाकडं वर्ग करण्यात आला. लूकआऊट नोटीस अंतर्गत संंबंधित व्यक्तीच्या देशाबाहेरील प्रवासाची माहिती सरकारला दिली जाते.

रवींद्रन गेल्या तीन वर्षांपासून वारंवार दिल्ली ते दुबई दरम्यान प्रवास करत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला ते बेंगळुरूमध्ये असल्याचं वृत्त होतं. मात्र, ते सध्या दुबईत आहेत आणि उद्या सिंगापूरला जाण्याचा त्यांचा विचार आहे, असं 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तात म्हटलं आहे.

गुंतवणूकदारांच्या हितासाठी

गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्याच्या उद्देशानं ईडीनं हा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून समजतं. रवींद्रन सध्या परदेशात असले तरी लूकआऊट नोटीस जारी झाल्यानंतर ते भारतात परतल्यास त्यांना पुन्हा देश सोडता येणं कठीण जाणार आहे. 

काय आहेत आरोप?

नोव्हेंबर २०२३ मध्ये ईडीनं फेमा कायद्यांंतर्गत बायजूची पॅरेंट कंपनी थिंक अँड लर्न आणि रवींद्रन यांना ९,३६२.३५ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बायजूला मिळालेली परकीय गुंतवणूक आणि त्याच्या बिझनेस मॉडेल संबंधी आलेल्या विविध तक्रारींच्या आधारे ईडीनं तपास सुरू केला. ईडीनं गेल्या वर्षी २७ व २८ एप्रिल रोजी बायजूची कार्यालयं आणि रवींद्रन यांच्या निवासस्थानी छापे टाकून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती.

भारताबाहेर केलेल्या निर्यातीतून मिळणाऱ्या रकमेची पूर्तता न करणं, थेट परकीय गुंतवणुकीशी संबंधित (FDI) कागदपत्रं भरण्यास उशीर होणं आणि भारताबाहेर केलेल्या रेमिटन्ससाठी कागदपत्रांची पूर्तता न करणं, परिणामी भारत सरकारच्या महसुलाचं नुकसान होणं असे आरोप कंपनीवर आहेत.

Whats_app_banner