share market news : इकोज मोबिलिटी शेअरच्या भावानं आज शेअर बाजारात आश्वासक पदार्पण केलं. बीएसई व एनएसई या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हा शेअर वधारून सूचीबद्ध झाला आहे. त्यामुळं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.
इकोजच्या शेअरची इश्यू प्राइस ३३४ रुपये होती. हा शेअर एनएसईवर ३९० रुपयांवर तर, बीएसईवर ३९१.३० रुपयांवर खुला झाला. ही किंमत इश्यू प्राइसपेक्षा १७ टक्क्यांनी जास्त आहे. बाजार तज्ञांनी इकोज मोबिलिटीचा शेअर ४० ते ४५ टक्के प्रीमियमसह उघडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. तो खरा ठरला नसला तरी शेअरची लिस्टिंग आश्वासक झाली आहे.
फेब्रुवारी १९९६ मध्ये स्थापन झालेली इकोज (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेड ही कंपनी भारतात चालकासह कार भाड्याने देण्याची सेवा पुरवते. कंपनीचा भर रेंटल आणि कर्मचारी वाहतूक सेवा वितरित करण्यावर आहे. भारतातील फॉर्च्युन ५०० कंपन्यांसह अनेक कॉर्पोरेट ग्राहकांना ही कंपनी सेवा पुरवते.
३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीनं संपूर्ण भारतात आपलं बस्तान बसवलं असून स्वत:च्या फ्लीट आणि व्हेंडर नेटवर्कद्वारे १०९ शहरांना सेवा दिली जात आहे. २१ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार आहे.
इकोज (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचा आयपीओ २८ ऑगस्ट रोजी बाजारात दाखल झाला होता. ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत तो सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. आयपीओची किंमत ३१८ ते ३३४ रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली होती. मोठ्या गुंतवणूकदारांनी कंपनीला १८०.३६ कोटी रुपयांचं योगदान दिलं. आयपीओचा लॉट किमान ४४ इक्विटी शेअर्सचा होता. इकोज मोबिलिटीचा आयपीओ ६४.१८ पट सबस्क्राइब झाला होता. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना एकूण आकाराच्या अर्धं, किरकोळ गुंतवणूकदारांना ३५ टक्के आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना उर्वरित १५ टक्के शेअर्सचं वाटप करण्यात आलं.
इकोज मोबिलिटीच्या आयपीओच्या द्वारे १८०००००० इक्विटी शेअर्स विक्रीसाठी काढण्यात आले होते. या सेलच्या माध्यमातून प्रवर्तक समूहातील राजेश आणि आदित्य लुंबा यांनी अनुक्रमे ९९ लाख आणि ८१ लाख इक्विटी शेअर्सची विक्रीला काढले होते.
इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड यांनी इकोज मोबिलिटी आयपीओच्या व्यवस्थापनाचे काम पाहिले तर, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार होते. ग्रे मार्केटमध्ये आयपीओचा मोठा बोलबाला होता.