Bonus share record date today : शेअरहोल्डर्सना सातत्यानं बोनस देणाऱ्या काही मोजक्याच कंपन्या आहेत. त्यात इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडचाही नंबर लागतो. या कंपनीनं पुन्हा एकदा बोनस शेअर्सची घोषणा केली असून त्याचा लाभ घेण्याची आज शेवटची संधी आहे.
इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडनं काही दिवसांपूर्वीच १:१ या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. त्यासाठी २९ नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट आहे. म्हणजेच आजच्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार शेअरकडं आकर्षित होत असून कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारी ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
इझी ट्रिप प्लॅनर्सनं यापूर्वी २०२२ आणि २०२३ मध्येही गुंतवणूकदारांना बोनस शेअर दिले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये कंपनीनं एक शेअर बोनस म्हणून दिला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये कंपनीनं एका शेअरवर ३ शेअर्स बोनस म्हणून दिले होते. तसंच, कंपनीच्या शेअर्सचं दोन भागांत विभाजनही झालं आहे. स्प्लिटनंतर इझी ट्रिप प्लॅनर्सच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर १ रुपयांपर्यंत खाली आली आहे.
रेकॉर्ड डेटच्या पार्श्वभूमीवर इझी ट्रिप प्लॅनर्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीच्या शेअरची किंमत ४.३० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर बुधवारच्या बंदच्या तुलनेत ३२.२३ रुपयांवर खुला झाला. काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव ३३.६५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
मात्र, गेल्या वर्षभरात बाजारातील गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत १४.३२ टक्क्यांनी घसरली आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून सुखद बाब म्हणजे कंपनीनं गेल्या आठवडाभरात १३.६४ टक्के परतावा दिला आहे.