Income Tax Department mail to tax payers : मागील तीन आर्थिक वर्षांत करदात्यांनी कर म्हणून भरलेली रक्कम त्यांच्या आर्थिक व्यवहारांशी जुळत नसल्यास प्राप्तिकर विभागानं अशा करदात्यांना ईमेल आणि एसएमएस पाठवणं सुरू केलं आहे. यासाठी ई-मोहिम राबविण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागानं रविवारी ही माहिती दिली.
२०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांत भरलेल्या कराच्या विश्लेषणाच्या आधारे व्यवहार आणि उत्पन्नात विसंगती आढळलेल्या करदात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा व्यक्ती आणि संस्थांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे याची माहिती दिली जात आहे, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) नं स्पष्ट केलं आहे.
प्राप्तिकर विभागानं अलीकडंच २२ हजार आयकरदात्यांना माहितीच्या नोटिसा बजावल्याचं सांगितलं जात आहे. या करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये केलेला कर कपातीचा दावा त्यांच्या फॉर्म-१६ किंवा वार्षिक माहिती पत्रक (AIS) किंवा आयकर विभागाच्या आकडेवारीशी जुळत नसल्याचं समोर आलं आहे. करदात्यानं या माहितीच्या नोटीसला प्रतिसाद न दिल्यास किंवा समाधानकारक खुलासा न केल्यास संबंधितांना टॅक्स डिमांडची नोटीस पाठवण्यात येणार आहे.
करदात्यांना सतर्क करणे हा ई मोहिमेचा हेतू आहे. जेणेकरून करदाते त्यांच्या आगाऊ कराची गणना वेळेत करून आयकर विवरणपत्र (ITR) योग्यरित्या दाखल करू शकतील आणि कराची थकबाकी १५ मार्च किंवा त्यापूर्वी जमा करू शकतील. एखाद्या करदात्याला कर भरायला आल्यास तो व्याजासह थकित कर भरू शकतो आणि अपडेटेट विवरणपत्र दाखल करू शकतो.
करदात्यांनी ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन त्यांचा वार्षिक माहिती अहवाल (AIS) तपासावा, असा सल्ला प्राप्तिकर विभागानं दिला आहे. वार्षिक माहिती अहवालामुळं आपली चूक लक्षात येते. तशी चूक असल्यास सुधारित विवरणपत्र भरता येऊ शकते. इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर (www.incometax.gov.in) लॉग इन करून किंवा AIS ॲप डाउनलोड करून वार्षिक विवरणाची माहिती मिळवता येते.
वार्षिक माहिती स्टेटमेंट (AIS) मध्ये आर्थिक वर्षातील व्यवहारांचे संपूर्ण तपशील असतात. रिटर्न भरण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. त्यामध्ये प्रत्येक व्यवहाराची अतिरिक्त माहिती असते. यामध्ये एकूण वार्षिक उत्पन्न, भाड्यातून मिळणारे उत्पन्न, बँक शिल्लक, रोख रक्कम किती जमा झाली, किती पैसे काढले, क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहार, लाभांश, बचत खात्यावर किती व्याज मिळाले, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांची खरेदी आणि विक्री, परदेश प्रवास, खरेदी आणि विक्री इत्यादी तपशीलाचा समावेश असतो.
https://eportal.incometax.gov.in या ई-फायलिंग वेबसाइटवर जा.
न जुळलेल्या माहितीचा 'ई-व्हेरिफिकेशन' टॅब इथं उपलब्ध असेल. यावर क्लिक करून तुम्हाला ऑन-स्क्रीन उत्तर द्यावं लागेल.
वेबसाइटवर आधीच नोंदणी केलेले करदाते त्यांच्या खात्यात लॉग इन केल्यानंतर ते करू शकतील.
जे नोंदणीकृत नाहीत त्यांनी प्रथम ई-फायलिंग वेबसाइटवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
करदात्यानं 'इतर' श्रेणी अंतर्गत व्याज उत्पन्न उघड केले असेल, तर त्याला व्याज उत्पन्नाशी संबंधित विसंगतीला प्रतिसाद देण्याची आवश्यकता नाही.
अशा परिस्थितीत विसंगती आपोआप दूर होईल आणि संपूर्ण अपडेट वेबसाइटवर दिसेल.