मराठी बातम्या  /  बिझनेस  /  मसालाकिंग दातारांनी मुलगा रोहितला भेट दिली १६ कोटींची अलिशान ‘रोल्स रॉयस’

मसालाकिंग दातारांनी मुलगा रोहितला भेट दिली १६ कोटींची अलिशान ‘रोल्स रॉयस’

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 10, 2024 09:32 PM IST

Masala King Dhananjay Datar : अल अदिल सुपर स्टोअर्सचे मालक मसाला किंग धनंजय दातार यांनी आपला मुलगा रोहित याला तब्बल १६ कोटींची अत्याधुनिक व अलिशान रोल्स रॉयस फँटम कार भेट दिली आहे.

Dhananjay datar gifted son rohit Rolls Royce Car
Dhananjay datar gifted son rohit Rolls Royce Car

दुबईत ३९ वर्षापूर्वी धनंजय दातार यांच्या वडिलींनी एक किराणा मालाचे  दुकान उघडले होते. त्याचे रुपातंर आता ५० सुपर स्टोअर्सच्या साखळीत झाले आहे. अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स अशी कंपनी स्थापन झाली आहे. दातारांची तिसरी पिढी व्यवसायात आली आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी धाकटा मुलगा रोहित याला तब्बल १६ कोटींची आलिशान रोल्स रॉयस फँटम एडिशन कार भेट दिली आहे. रोहित कंपनीच्या संचालकपदावर कार्यरत आहे. 

मुलाला अलिशान कार भेट दिल्यानंतर डॉ. दातार म्हणाले की, रोहित वर्षभरापासून कंपनीच्या व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने व्यवसाय वृद्धीसाठी केलेल्या भरीव कामगिरीचे कौतुक म्हणून ही भेट दिली आहे. मुलाचे अवाजवी लाड करणे किंवा निव्वळ दिमाखासाठी खर्च करणे हा यामागील हेतू नाही. 

३९ वर्षापूर्वी जेव्हा वडिलांनी दुबईत एक साधे किराणा मालाचे दुकान उघडले तेव्हा वयाच्या विशीत मी वडिलांबरोबर येथे आलो होतो. तेव्हा पाठीवरून गोण्या उचलण्याचे कामही मी केले होते. वडिलांची एक विशिष्ट सवय होती. मुलांनी काही कौतुकास्पद काम आणि कष्ट केले तरच ते बक्षीस देत. मी तीच परंपरा पुढे चालवत आहे. मुलगा रोहित याने गेल्या वर्षभरात कंपनीच्या रिटेल विक्रीत २५ टक्के लक्षणीय वाढ घडवून आपल्या कर्तृत्वाचा परिचय दिला आहे. 

दातार यांनी यापूर्वी त्यांच्या पत्नीलाही रोल्स रॉयस कार भेट दिली होती. त्याबाबत त्यांनी सांगितले की, माझ्या पत्नीने जागतिक मंदीच्या काळातच कंपनीत वित्त संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. अनेक उद्योग बंद पडत असताना तिने कंपनीची ४०० टक्क्यांनी प्रगती केली होती. तिच्या कामाचे कौतुक करण्यासाठी तिला रोल्स रॉइसची फँटम कार भेट दिली. माझा थोरला मुलगा हृषिकेशगी काही वर्षापूर्वी व्यवसायात आला. त्याने डोअरस्टेप डिलिव्हरी, ई-कॉमर्स,  ऑनलाईन पेमेंट सिस्टिम, डिजीटल मार्केटिंग असे विविध उपक्रम यशस्वी राबवून कंपनीला आधुनिकतेच्या वाटेवर नेले. त्यालाही मी मर्सिडीस जी ६३ व ऑडी या अलिशान कार भेट दिल्या. मुले मेहनती, कल्पक आणि कर्तृत्ववान असणे ही कुठल्याही वडिलांसाठी अभिमानाची बाब असते. म्हणूनच मी मुलांचे यथायोग्य कौतुक केले आहे.

रोहित दातार म्हणाला, एका दुकानाचे रुपांतर माझ्या बाबांनी जागतिक समूहात केले. गरीबीतून पुढे आलेल्या माझ्या बाबांना त्यांच्या उमेदीच्या काळात परिस्थितीमुळे साधी सायकलही मिळू शकली नव्हती. पण आम्हाला उत्कृष्ट व आलिशान कार भेट देऊन बाबा एकप्रकारे त्यांच्या तरुण वयाचे प्रतिबिंब आमच्यात पाहात आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन अदील समूहाला सातत्याने प्रगतीच्या नवनव्या टप्प्यावर पोचवणे, हेच आमचे उदिष्ट्य राहील.

WhatsApp channel

विभाग