Multibagger stock : ह्याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या पाच वर्षांत १ लाखाचे झाले ३२ लाख
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stock : ह्याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या पाच वर्षांत १ लाखाचे झाले ३२ लाख

Multibagger stock : ह्याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या पाच वर्षांत १ लाखाचे झाले ३२ लाख

Jul 31, 2024 12:00 PM IST

Multibagger Defence Stock : झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना त्यांच्या संयमाचं गोड फळ दिलं आहे. तर, सहा महिन्यात पैसे दुप्पट करून दिले आहेत.

ह्याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या पाच वर्षांत १ लाखाचे झाले ३२ लाख
ह्याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या पाच वर्षांत १ लाखाचे झाले ३२ लाख

Multibagger stock : रोजच्या बातम्यांनी विचलित न होता, कोणत्याही अमिषाला बळी न पडता, स्वत:च्या अभ्यासावर विश्वास ठेवून वाट पाहण्याची तयारी असेल तर शेअर मार्केटसारखी दुसरी गुंतवणूक नाही. याची प्रचिती अधूनमधून येत असते. अँटी ड्रोन निर्माता झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना या संयमाचं फळ दिलं आहे.

झेन टेकमध्ये पाच वर्षांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी झाली आहे. त्यांच्या एक लाख रुपयांचे सुमारे ३२ लाख झाले आहेत. इतकंच नव्हे तर, सहा महिन्यांपूर्वी पैसे गुंतवणाऱ्यांना या डिफेन्स स्टॉकनं दुप्पट परतावा दिला आहे. आज बाजार उघडल्यानंतर हा शेअर १७४३ रुपयांवर गेला. हा मागील ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. मात्र, सध्या तो किंचित घसरून ट्रेड करत आहे.

पाच दिवसांत १६ टक्के परतावा

पाच दिवसांपूर्वी झेन टेकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या शेअरनं जबरदस्त परतावा दिला आहे. या कालावधीत शेअरमध्ये १६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर, महिन्याभरात ३० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत कंपनीनं ११५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास या शेअरमध्ये १७५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ ५३.८० रुपये होती. आज ती १७४३ रुपयांवर पोहोचला असून हा परतावा तब्बल ३१०० टक्के आहे.

कंपनीच्या महसुलातही मोठी वाढ

जून तिमाहीत झेन टेकचा महसूल ९२ टक्क्यांनी वाढून २५३.९६ कोटी रुपये झाला आहे, तर निव्वळ नफा ५७ टक्क्यांनी वाढून ७४.१८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या काही वर्षांत सशस्त्र दलांनी सामरिक प्रशिक्षणाची गरज ओळखली आहे आणि यामुळं कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत संरक्षण निर्यातीचे ५० हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. जून तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ साठी ९०० कोटी रुपयांच्या उलाढालीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. २०२१ मध्ये १४० टक्के आणि २०२० मध्ये ६० टक्क्यांच्या तुलनेत २०२३ मध्ये झेन टेकचे शेअर्स ३३१ टक्क्यांनी वधारले होते.

 

(डिस्क्लेमर: वरील मतं आणि शिफारशी विश्लेषकांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

 

Whats_app_banner