Rule Change From 1 June : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान १ जून रोजी होणार आहे. या दिवशी अनेक नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांचा समावेश असेल. जाणून घेऊन नवीन नियमांबाबत…
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं अलीकडंच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. १ जून २०२४ पासून तुम्ही RTO ऐवजी खासगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकाल. या केंद्रांना परवाना पात्रतेच्या चाचण्या घेण्यासाठी आणि प्रमाणपत्रे जारी करण्याची अधिकृत परवानगी दिली जाणार आहे.
याशिवाय, वेगानं गाडी चालवल्याबद्दल होणारा दंड १००० ते २००० रुपयांच्या दरम्यान असेल. मात्र, जर एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेला तर त्याला २५,००० रुपये इतका मोठा दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त, वाहन मालकाची नोंदणी रद्द केली जाईल आणि अल्पवयीन व्यक्ती २५ वर्षांची होईपर्यंत परवान्यासाठी अपात्र ठरेल.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत १४ जूनपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तुम्हाला तुमचं आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करता येणार आहे. तथापि, तुम्हाला आधार कार्ड ऑफलाइन अपडेट करायचं असल्यास प्रत्येक बदलासाठी ५० रुपये द्यावे लागतील.
एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला अपडेट केल्या जातात. १ जून रोजी तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती ठरवणार आहेत. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या आणि जूनमध्ये पुन्हा सिलिंडरच्या किमती कमी केल्या जातील असा अंदाज आहे.
आरबीआयनं प्रसिद्ध केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, जूनमध्ये बँका १० दिवस बंद राहतील. यात रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे. याशिवाय जूनमधील इतर सुट्ट्यांमध्ये राजा संक्रांती आणि ईद-उल-अजहा यांचा समावेश होतो.
संबंधित बातम्या