उद्योजक धनंजय दातार यांना यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार-dr babasaheb ambedkar award to businessman dhananjay datar ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  उद्योजक धनंजय दातार यांना यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

उद्योजक धनंजय दातार यांना यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

Aug 08, 2024 10:00 AM IST

दुबईस्थित उद्योजक धनंजय दातार यांना मुंबईच्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’तर्फ ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २०२४’ देऊन गौरवण्यात आले आहे.

उद्योजक धनंजय दातार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
उद्योजक धनंजय दातार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

दुबईस्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग धनंजय दातार यांना मुंबईच्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’तर्फे दिला जाणारा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २०२४’ देऊन गौरवण्यात आले आहे. धनंजय दातार यांनी सामाजिक क्षेत्रात विशेषतः वंचित जनांना न्याय देण्यासाठी केलेले उत्कृष्ट कार्य व योगदान यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच हा पुरस्कार दातार यांना दुबईत प्रदान केला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना धनंजय दातार म्हणाले, ‘उद्योगाइतकेच सामाजिक कार्यात रममाण व्हायला मला पूर्वीपासून आवडते. समाजाने आपल्याला मोठे केले तर आपणही त्या देण्याची परतफेड करावी, अशी माझ्या आई-वडिलांची शिकवण होती. त्याला अनुसरुन मी माझ्या कमाईचा लक्षणीय हिस्सा नेहमी समाज कल्याणासाठी खर्च करत आलो आहे. शाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना दरवर्षी मदत केली, लाड कारंजा या माझ्या गावी सर्व समाजासाठी खुले असलेले मंगल कार्यालय बांधले आणि समाज सेवक विकास आमटे व सिंधुताई सपकाळ यांच्या लोककल्याण प्रकल्पांनाही मदत केली. मला यापूर्वी सामाजिक उद्योजकतेसाठी दिला जाणारा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला आहे. आता सामाजिक क्रांतीचे प्रणेते व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना अत्यंत अभिमान वाटत आहे. वंचित समाजातील मुलांच्या तसेच आदिवासी मुलांच्या शिक्षण विकासासाठी मी दहा लाख रुपयांचा निधी पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्द करत आहे. त्याखेरीज पुढील काळातही वंचित समाजातील गरीब विद्यार्थ्यांना अन्य शैक्षणिक साधनांच्या मदतीची माझी तयारी आहे.’

धनंजय दातार यांच्या समाज कल्याण कार्याविषयी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. यंदा ८ जुलैला ही संस्था आपल्या स्थापनेचा ७९ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. वंचित समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या समाजहितैषी व्यक्तींना आमची संस्था दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करते. धनंजय दातार यांचे आजवरचे निरपेक्ष समाजकार्य व गरीब घटकांना मदत करण्यातील दातृत्वशीलता प्रशंसनीय असल्याने त्यांना स्थापनादिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे.’