FASTag Update : महामार्गावरील टोल नाक्यावर गाडी थांबून पैसे भरण्यामध्ये जाणारा वेळ वाचावा, या उद्देश्याने FASTag तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, अजूनही बरेच वाहनधारक आपल्या गाडीच्या विंडशील्डला FASTag जोडत नसल्यामुळे टोल प्लाझावर नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊनच आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI)नवा नियम बनवला आहे. या नव्या नियमानुसार, जे वाहनचालक वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला फास्ट टॅग जोडत नाहीत, त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) समोरच्या विंडशील्डवर आतून फास्टॅग न लावणाऱ्या युजर्ससाठी दुप्पट शुल्क बंधनकारक केले आहे. प्रवासादरम्यान टोल भरण्यास टाळाटाळ करू नये, पेसे देताना वेळ वाया जाऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. थकबाकीदारांना काळ्या यादीतही टाकले जाऊ शकते, असे एनएचएआयने म्हटले आहे.
"विंडस्क्रीनवर जाणीवपूर्वक फास्टॅग न लावल्याने टोल नाक्यांवर अनावश्यक विलंब होतो ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांची गैरसोय होते, असे एनएचएआयने एका निवेदनात म्हटले आहे.
ही माहिती सर्व टोल नाक्यांवर ठळकपणे प्रदर्शित केली जाईल जेणेकरून महामार्ग वापरकर्त्यांना समोरच्या विंडशील्डवर निश्चित फास्टॅगशिवाय टोल लेनमध्ये प्रवेश न केल्यास दंडाची माहिती मिळेल, असे एनएचएआयने म्हटले आहे.
टोल नाक्यावर आकारण्यात येणारे शुल्क आणि वाहनाच्या उपस्थितीची योग्य नोंद ठेवण्यासाठी शुल्क प्लाझावरील वाहन नोंदणी क्रमांक (व्हीआरएन) असलेले सीसीटीव्ही फुटेज न चिकटवलेल्या फास्टॅग
प्रकरणांची नोंद करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार, वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला FASTag जोडणे बंधनकारक आहे. ज्यांच्या वाहनावर FASTag योग्य प्रकारे लावलेला नसेल अशा वाहनधारकांच्या खिशाला मोठा भुर्दंड बसणार आहे. ज्या वाहनांवर FASTags नसेल अशा वाहनांचे वाहन नोंदणी क्रमांक (VRN) रेकॉर्ड करण्यासाठी टोल प्लाझाकडून CCTV चा वापर योग्य प्रकारे करण्यात येणार आहे. यासीसीटीव्ही फुटेजमुळे आकारण्यात येणाऱ्या टोलच्या अचूक नोंदी ठेवण्यासही मदत होईल.