Dmart share price : डीमार्टची मूळ कंपनी असलेल्या अॅव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत आज मोठी घसरण झाली आहे. सोमवारी सकाळी कंपनीचे शेअर तब्बल ९ टक्क्यांहून जास्त घसरले. २०१९ नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली ही सर्वात मोठी एक दिवसाची घसरण आहे. डीमार्टच्या रेटिंगमध्ये झालेला बदल यासाठी कारणीभूत मानला जात आहे.
डीमार्टमध्ये दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचा हिस्सा आहे. शेअरमध्ये झालेल्या घसरणीमध्ये राधाकिशन दमानी आणि कंपनीच्या इतर प्रवर्तकांना मोठा धक्का बसला आहे. या घसरणीणुळं गुंतवणूकदारांचं तब्बल २०,८०० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कंपनीत प्रवर्तकांची एकूण हिस्सेदारी ७४.६५ टक्के आहे. सकाळच्या तुलनेत शेअर पुन्हा सावरला असला तरी आताही ८ टक्क्यांनी घसरून ट्रेड करत आहे. आजच्या पडझडीनंतर कंपनीच्या शेअरची किंमत ४२०३ रुपयांवर आली आहे.
शेअर ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गननं रेटिंगमध्ये बदल केला आहे. अॅव्हेन्यू सुपरमार्टची रेटिंग ब्रोकरेज फर्मनं ‘ओवरवेट’ वरून न्यूट्रलवर आणली आहे. याशिवाय जेपी मॉर्गननं डीमार्टच्या टार्गेट प्राइसमध्येही कपात केली आहे. ब्रोकरेजनं डीमार्टच्या शेअरची टार्गेट प्राइस ५४०० रुपयांवरून ४७०० रुपयांपर्यंत खाली आणली आहे.
अॅव्हेन्यू सुपरमार्टचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले नसल्याचं जेपी मॉर्गननं म्हटलं आहे. ऑनलाइन विक्रीमुळं अॅव्हेन्यू सुपरमार्टवर परिणाम झाला आहे. कंपनीच्या किराणा सेक्शनवर विशेष परिणाम झाला आहे. याच कारणामुळं जेपी मॉर्गननं कंपनीच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील महसुली वाढीबद्दलही सावध भूमिका घेतली आहे.
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं देखील आपल्या रेटिंगमध्ये कपात केली आहे. अॅव्हेन्यू सुपरमार्टनं शेअरची टार्गेट प्राइस ३,७०२ रुपयांवर खाली नेली आहे. गोल्डमनसॅकनं डीमार्टचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसनं ४००० रुपये प्रति शेअरची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.
CNBCTV18 रिपोर्टनुसार, ब्रोकरेज फर्म बर्नस्टीन डीमार्टच्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल आशावादी आहे. ब्रोकरेज हाऊसनं ५८०० रुपये प्रति शेअरची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. हे निरीक्षण इतर ब्रोकरेज हाऊसेसपेक्षा पूर्ण उलट आहे. सीएलएसएनं ५३६० रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. ब्रोकरेज हाऊसचं 'आउटपरफॉर्म' रेटिंग आहे.
संबंधित बातम्या