Dhantrayodashi : आज धनतेरसच्या दिवशी जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि किंमत पाहून विचार बदलत असाल तर तसं करू नका. कारण, सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यात अगदी १ रुपयापासून गुंतवणूक करण्याचाही पर्याय आहे. आजच्या धनत्रयोदशीच्या निमित्तानं जाणून घेऊया चार उत्तम पर्याय…
फिजिकल गोल्ड : फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी सराफा बाजारात दागिने किंवा सोन्याची बिस्किट-नाणी उपलब्ध आहेत. मात्र, दागिने खरेदी करणे हा सोन्यातील गुंतवणुकीचा योग्य मार्ग मानत नाहीत. कारण, यावर जीएसटी आणि मेकिंग चार्ज भरावा लागतो. सोन्याची बिस्किटे किंवा नाण्यांमध्ये गुंतवणूक करू शकता.
गोल्ड बाँड : गोल्ड बाँड खरेदी करण्यासाठी ब्रोकरमार्फत डिमॅट खाते उघडावे लागते. आपण एनएसईवर उपलब्ध गोल्ड बाँड्सचे युनिट खरेदी करू शकता आणि आपल्या डीमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून तितकीच रक्कम कापली जाईल. त्यात ऑफलाइनही गुंतवणूक करता येते.
गोल्ड ईटीएफ : सोन्यासारखे शेअर्स खरेदी करण्याच्या सुविधेला गोल्ड ईटीएफ म्हणजेच गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणतात. स्टॉक एक्स्चेंजमध्ये याची खरेदी-विक्री करता येते. गोल्ड ईटीएफचा बेंचमार्क स्पॉट म्हणजे सोन्याचे दर, आपण ते सोन्याच्या वास्तविक किंमतीच्या जवळ खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला डीमॅट खाते उघडावे लागेल.
पेमेंट अॅप : आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हव्या त्या किमतीत सोनं खरेदी करू शकता. अगदी १ रुपया. अॅमेझॉन पे, गुगल पे, पेटीएम, फोनपे आणि मोबिक्विक सारख्या प्लॅटफॉर्मवर हे फीचर उपलब्ध आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्या धनतेरसपासून सोन्याच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने आता उच्चांकी पातळी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात २३ ऑक्टोबर रोजी २,७५९ डॉलर प्रति औंसच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यापासून सोने २,७०० डॉलरच्या वर कायम आहे. मुंबईच्या स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर ७९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होता.