जागतिक हिरे उद्योगावर आर्थिक मंदीचे भयंकर सावट उभे राहिले आहे. बाजारात हिऱ्यांच्या मागणीत घट झाल्याने गुजरात येथील सुरत शहरातील हिरे बाजारावर त्याचे विपरित परिणाम दिसून येत आहे. सुरत शहरातील ‘किरण जेम्स’ या हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कंपनीने आपले उत्पादन काह प्रमाणात थांबवले असून ५० हजार कर्मचाऱ्यांना १७ ते २७ ऑगस्ट दरम्यान १० दिवस ‘सक्ती’ची सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, हिरे उद्योगात सध्या मागणीत घट झाली आहे. जागतिक बाजारात पॉलिश्ड हिऱ्यांना फार मागणी नाही. हिऱ्यांच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांना १० दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच आम्ही असा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष वल्लभभाई लखानी यांनी पत्रकारांना दिली. मात्र कामगारांना त्यांच्या 'सुट्टीच्या दिवसां'चा मोबदला दिला जाईल, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऐरवी गुजरातमधील हिरे कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीदरम्यान दीर्घ सुट्टी जाहीर करत असतात. परंतु ही जाहीर केलेली सुट्टी असामान्य असून उत्पादन कमी करण्याचे एक साधन असल्याते कंपनीने स्पष्ट केले आहे. इतर कंपन्यांनीही अशाच प्रकारची उपाययोजना केली तर बाजरात हिऱ्यांचा पुरवठा नियंत्रित होऊन भविष्यात किंमती वाढतील. याचा हिरे उद्योगाला फायदा होईल, असा विश्वास वल्लभभाई लखानी यांनी व्यक्त केली.
सूरतमध्ये लखानी यांच्या हिरे कंपनीमध्ये हिऱ्यांवर पैलू पाडण्यासाठी ५० हजार कामगार आहेत. त्यापैकी ४० हजार कामगार हे नैसर्गिक पद्धतीने आणि १० हजार कामगार प्रयोगशाळेत हिऱ्यांवर पैलू पाडतात. डिसेंबर २०२३ मध्ये सूरतमध्ये सुरत डायमंड बोर्स (एसडीबी) चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. ‘किरण जेम्स’ या हिरे कंपनीचं मुख्यालय आधी मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल येथे होतं. परंतु त्यांनी नंतर आपलं मुख्यालय सुरत येथे हलवलं होतं. ‘किरण जेम्स’ या कंपनीची वार्षिक उलाढाल ही १७ हजार कोटी रुपये एवढी आहे. जगातील सर्वात मोठी नैसर्गिक पद्धतीने हिऱ्यांवर पैलू पाडून त्याचे उत्पादन करणारी कंपनी असल्याचा दावा आहे. कंपनीकडून सर्वाधिक पॉलिश्ड हिऱ्यांचा निर्यात करण्यात येतो.