Penny Stock News : शेअर मार्केटमध्ये निफ्टी-५० आणि बीएसई-३० कंपन्यांची चर्चा नेहमीच सुरू असते. मोठ्या कंपन्यांच्या या चर्चेत चिमुकल्या शेअर्सकडं कोणाचं लक्षच जात नाही. मात्र, काही शेअर अचानक मोठा धमाका करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरचंही असंच झालं आहे.
मागील काही दिवसांपासून डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर चर्चेत आहे. या कंपनीचा शेअर आज किंचित वाढीसह ५.८८ रुपयांवर पोहोचला आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत हा शेअर ३० टक्क्यांनी वधारला आहे. मागच्या सहा महिन्यांत त्यात २५ टक्के वाढ झाली आहे. तर, वर्षभरात शेअरनं ३५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. हा शेअर ८ रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेसच्या स्टॉक चार्ट पॅटर्नवर हा शेअर वाढण्याची शक्यता आहे. या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ७.६० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ३.९३ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १३.४५ कोटी रुपये इतकं आहे.
शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असलेल्या, पण शेअरची किंमत ३० रुपयांपेक्षा कमी असलेल्या कंपन्यांच्या स्टॉक्सना पेनी स्टॉक म्हणतात. कमी लिक्विडिटीमुळं पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं ठरू शकतं. एखाद्या छोट्याशा कारणानं देखील हे शेअर मोठ्या प्रमाणात कोसळू शकतात किंवा वाढू शकतात. त्यामुळं त्यात मोठी जोखीम असते.