Stock Market Update : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अल्पावधीतच दबदबा निर्माण करणाऱ्या सायंट कंपनीच्या शेअरच्या किंमतीत आज मोठी घसरण झाली. कंपनीच्या शेअरचा भाव तब्बल २० टक्क्यांनी घसरून १४०० रुपयांपर्यंत खाली आला. शेअरच्या घसरणीमागे ३ प्रमुख कारणं आहेत.
पहिलं कारण म्हणजे खराब तिमाही निकाल. तिमाही निकालानंतर कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ साठी महसुली वाढीत कपात केल्यानं गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. महसुली वाढ स्थिर राहील असं अशी अपेक्षा याआधी कंपनीला होती. मात्र आता ही वाढ नकारात्मक होईल असं बोललं जातं. २० टक्क्यांहून अधिक घसरणीनंतर कंपनीच्या शेअरची किंमत १४० रुपयांवर आली आहे. ही शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे.
कंपनीचे सीईओ कार्तिकेयन नटराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नव्या हंगामी सीईओची नियुक्ती करण्यात आली आहे. या आकस्मिक बदलांमुळं गुंतवणूकदारांनाच नव्हे तर तज्ज्ञांनाही धक्का बसला आहे. त्यामुळं त्यांनी कंपनीचे उत्पन्न आणि टार्गेट प्राइसमध्ये कपात केली आहे.
या शेअरच्या वाटचालीचा पाठपुरावा करणाऱ्या ब्रोकरेज कंपनी नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेज हाऊसनं या आयटी शेअरला 'सेल' टॅग दिला आहे.
डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकूण निव्वळ नफा १२७.७० कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर तो ३१.५६ टक्के कमी आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १८६.६० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर कंपनीच्या महसुलात ०.५ टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल १९०९.८० कोटी रुपये होता.
संबंधित बातम्या