Share Market : डिसेंबर तिमाहीच्या मजबूत निकालानंतर कमिन्स इंडियाच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आज सलग तिसऱ्या सत्रात कमिन्स इंडियाच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या कालावधीत शेअर १४ टक्क्यांनी वधारला. या सगळ्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या संचालक मंडळानं गुंतवणूकदारांना लाभांशाची (Dividend) भेट दिली आहे.
कमिन्स इंडियाच्या संचालक मंडळानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २,७७,२००,००० इक्विटी शेअर्सवर (अंकित मूल्य प्रत्येकी २/- रुपये) प्रति इक्विटी शेअर १८ रुपये म्हणजेच ९०० टक्के अंतरिम लाभांश मंजूर करून जाहीर केला आहे. या अंतरिम लाभांशासाठी सभासदांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीनं शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश ३ मार्च २०२५ पर्यंत दिला जाईल.
कमिन्स इंडियाचा करोत्तर नफा ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ११.९ टक्क्यांनी वाढून ५५८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो ४९९ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल २१.८ टक्क्यांनी वाढून ३०९६ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत तो २,५४१ कोटी रुपये होता.
या तिमाहीत एबिटडा ५८९ कोटी रुपये आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील ५१४ कोटी रुपयांच्या तुलनेत तो १०.१ टक्क्यांनी अधिक आहे. तथापि, एबिटडा मार्जिन आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील २१.३ टक्क्यांवरून २०५ बेसिस पॉईंट्सनं घटून १९.३ टक्क्यांवर आलं आहे.
कमिन्स इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्वेता आर्य म्हणाल्या की, बहुतेक देशांमध्ये महागाई कमी होत असली तरी विविध क्षेत्रांमध्ये अनिश्चितता कायम आहे, ज्याचा परिणाम जागतिक आर्थिक दृष्टीकोनावर होत आहे. येत्या काही वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेला आकार देण्यात अमेरिकेचे धोरण महत्त्वाची भूमिका बजावेल, असं त्यांनी अधोरेखित केलं. जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असूनही, आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील मंद विकासदरानंतर भारतीय अर्थव्यवस्था चांगली सुधारत आहे, मजबूत जीएसटी संकलन आणि आयआयपी आणि पीएमआय सारख्या प्रमुख निर्देशांकांमुळं सर्वकाही नियंत्रणात राहील, असं त्या म्हणाल्या.
'कमिन्स इंडियानं आपले फायदेशीर वाढीच धोरण अंमलात आणणं सुरू ठेवलं आणि सर्व विभागांमध्ये जोरदार मागणीमुळं आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही महसूल मिळविला आहे, असं त्यांनी सांगितलं.
कमिन्स इंडिया ही कंपनी ट्रक इंजिनसाठी ओळखली जात असली तरी पॉवर जनरेटर किंवा जेनसेटमध्ये भारतात तिचा व्यवसाय अव्वल स्थानी आहे. तिसऱ्या तिमाहीत इंजिन आणि पॉवर जनरेटरच्या विक्रीनं कंपनीच्या संपूर्ण महसुलात योगदान दिलं.
गेल्या एका वर्षात कमिन्सच्या शेअरमध्ये जवळपास २२ टक्के आणि फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सलग चार महिन्यांच्या तोट्यानंतर फेब्रुवारीत ही वाढ झाली आहे. जानेवारीत ११ टक्के, डिसेंबरमध्ये ६ टक्के, नोव्हेंबरमध्ये ०.५ टक्के आणि ऑक्टोबरमध्ये ८ टक्के घसरण झाली. सध्या हा शेअर जून २०२४ मधील ४१६९.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीपासून २६ टक्क्यांहून अधिक दूर आहे, फेब्रुवारी २०२४ मध्ये नोंदवलेल्या २३७३.४० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून तो जवळपास ३० टक्क्यांनी वधारला आहे.
संबंधित बातम्या