Crorepati stock : शेअर बाजारात कधी काय होईल, कधी कोणाचे नशीब किती बदलेल काहीच सांगता येत नाही. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या शेअर्सनं या अनिश्चिततेवर जणू शिक्कामोर्तब केलं आहे. या कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना रातोरात कोट्यधीश आणि अब्जाधीश बनवलं आहे.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या शेअरनं मंगळवारी २,३६,२५० रुपयांचा भाव गाठला. दलाल स्ट्रीटवर स्मॉलकॅप शेअरनं इतिहास रचला. एका दिवसात कंपनीच्या शेअरची किंमत ३.५३ रुपयांवरून २,३६,२५० रुपयांवर पोहोचली. म्हणजेच त्यात ६६,९२,५३५% इतकी प्रचंड वाढ झाली. या कामगिरीमुळं एल्सिडनं एमआरएफ या भारतातील सर्वात महागड्या शेअरलाही मागे टाकलं आहे. एमआरएफच्या शेअरची किंमत १,२२,६४३ रुपये आहे.
यावर्षी जुलैमध्ये एल्सिड इन्व्हेंस्टमेंटचा शेअर केवळ ३.२१ रुपयांचा होता. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे समभाग मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी बीएसईवर (मुंबई स्टॉक एक्स्चेंज) पुन्हा सूचीबद्ध झाले. शेअरची लिस्टिंग किंमत २,२५,००० रुपये होती, परंतु ट्रेडिंग दरम्यान ती ५ टक्क्यांनी वाढून २,३६,२५० रुपये झाली. म्हणजेच या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना ३ महिन्यांत ६७० कोटी रुपये मिळाले आहेत.
बीएसईच्या २१ ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार निवडक इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपन्यांना (आयएचसी) पुन्हा सूचीबद्ध करण्यात आले आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट ही त्यापैकीच एक कंपनी होती. यापूर्वी अल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या प्रवर्तकांनी स्वेच्छेनं १,६१,०२३ रुपये प्रति शेअर बेस प्राइसवर त्याचे डीलिस्टिंग करण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी विशेष प्रस्ताव मांडण्यात आला होता. याशिवाय नलवा सन्स इन्व्हेस्टमेंट्स, टीव्हीएस होल्डिंग्स, कल्याणी इन्व्हेस्टमेंट कंपनी, एसआयएल इन्व्हेस्टमेंट्स, महाराष्ट्र स्कूटर्स, जीएफएल, हरयाणा कॅफिन आणि पिलानी इन्व्हेस्टमेंट अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन या कंपन्यांचा समावेश आहे.
कंपनीचा निव्वळ नफा जून २०२३ मधील ९७.४१ कोटी रुपयांवरून जून २०२४ मध्ये ३९.५७ टक्क्यांनी वाढून १३५.९५ कोटी रुपये झाला. जून २०२४ मध्ये निव्वळ विक्री १७७.५३ कोटी रुपये होती. जून २०२३ मधील १२८.३८ कोटी रुपयांच्या तुलनेत ती ३८.२८ टक्क्यांनी अधिक आहे.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स ही कंपनी आरबीआयकडं गुंतवणूक कंपनींच्या श्रेणीअंतर्गत नोंदणीकृत एनबीएफसी आहे. सध्या कंपनीचा स्वत:चा कोणताही ऑपरेटिंग बिझनेस नसला तरी एशियन पेंट्स सारख्या इतर बड्या कंपन्यांमध्ये कंपनीची बरीच गुंतवणूक आहे. एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये एल्सिड इन्व्हेस्टमेंटचे २,८३,१३,८६० इक्विटी शेअर्स किंवा २.९५ टक्के हिस्सा आहे.