Stock Market Updates : अनेक गुंतवणूकदारांना रातोरात करोडपती बनवणाऱ्या व देशातील सगळ्यात महाग ठरलेल्या एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअरला आता उतरती कळा लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा शेअर रोज जवळपास १५ हजार रुपयांनी घसरत आहे. तब्बल ३ लाख ३२ हजारांचा उच्चांक नोंदवणारा हा शेअर तीन दिवसांत २ लाख ८३ हजारांपर्यंत खाली आला आहे.
मुंबई शेअर बाजारात २९ ऑक्टोबर रोजी विशेष कॉल लिलाव आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी अल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या शेअरने ट्रेडिंगदरम्यान २,३६,२५० रुपयांचा भाव गाठला. स्पेशल कॉल लिलावापूर्वी हा शेअर बीएसईवर २१ जून २०२४ रोजी ३.५३ रुपयांवर बंद झाला होता. २९ ऑक्टोबरला पुन्हा लिस्ट झाल्यानंतर या शेअरला सलग अपर सर्किट लागत होतं. या तेजीमुळं हा शेअर ३,३२,३९९.९५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, आता त्यात घसरण होताना दिसत आहे.
मागच्या तीन ट्रेडिंग दिवसांपासून हा शेअर सातत्यानं ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटला स्पर्श करत आहे. या कालावधीत त्यात सुमारे ४५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज, बुधवारी हा शेअर २८३३३९.६६ रुपयांवर आला आहे.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट ही कंपनी आरबीआयकडे गुंतवणूक कंपनी श्रेणीअंतर्गत नोंदणीकृत एनबीएफसी आहे. सध्या कंपनीचा स्वत:चा कोणताही ऑपरेटिंग बिझनेस नसला तरी एशियन पेंट्स सारख्या इतर बड्या कंपन्यांमध्ये कंपनीची बरीच गुंतवणूक आहे. कंपनीचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश आहे. कंपनीची गुंतवणूक ११,००० कोटी रुपयांहून अधिक असून मार्केट कॅप ५,६६६.७९ कोटी रुपये आहे.