cost of living survey : भारतातील सर्वात महागडं शहर कोणतं आणि का? सर्वेक्षणातून समोर आली ही माहिती
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  cost of living survey : भारतातील सर्वात महागडं शहर कोणतं आणि का? सर्वेक्षणातून समोर आली ही माहिती

cost of living survey : भारतातील सर्वात महागडं शहर कोणतं आणि का? सर्वेक्षणातून समोर आली ही माहिती

Jun 18, 2024 12:05 PM IST

Most expensive city in India 2024 : जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हाँगकाँगचं पहिलं स्थान कायम आहे. भारतातील सर्वात महागडं शहर कोणतं माहीत आहे का?

भारतातील सर्वात महागडं शहर कोणतं आणि का? सर्वेक्षणातून समोर आली ही माहिती
भारतातील सर्वात महागडं शहर कोणतं आणि का? सर्वेक्षणातून समोर आली ही माहिती

Most expensive city in India 2024 : देशाची आर्थिक राजधानी, मायानगरी, स्वप्ननगरी अशी विविधांगी ओळख असलेले मुंबई शहर हे देशातील सर्वात महागडं शहर ठरलं आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. मुंबई हे भारतात महागडं शहर असलं तरी जगातील महाग शहरांच्या यादीत ते १३६ व्या क्रमांकावर आहे. तर, हाँगकाँग हे जगातील सर्वात महागडं शहर ठरलं आहे.

'मर्सर' या एचआर कन्सल्टन्सीने ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’ (राहणीमान खर्च)च्या निकषावर हे सर्वेक्षण केलं आहे. यात पर्सनल केअर, वीज आणि अन्य सेवा, वाहतूक आणि घरभाडे आदी घटकांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वच बाबतीत मुंबई प्रचंड महाग असल्याचं दिसून आलं आहे.

मुंबईपाठोपाठ दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, पुणे या शहरांचा क्रमांक लागतो. हिंदी सिनेसृष्टीचं हृदय आणि बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांची घरं असलेली मुंबई दिवसेंदिवस महागाईच्या पायऱ्या चढत आहे. महाग शहरांच्या जागतिक क्रमवारीत मुंबईनं आधीच्या स्थानापासून ११ पायऱ्या वर चढत १३६ वं स्थान पटकावलं आहे, तर दिल्ली१६४ व्या स्थानी आहे.

चेन्नई पाच स्थानांनी घसरून १८९व्या, बेंगळुरू सहा स्थानांनी घसरून १९५व्या आणि हैदराबाद २०२व्या स्थानावर कायम आहे. पुणे आठ स्थानांच्या प्रगतीसह २०५व्या आणि कोलकाता चार स्थानांच्या प्रगतीसह २०७व्या स्थानावर पोहोचलं आहे.

मुंबईत नेमकं काय जास्त महाग?

वाहतूक खर्चाच्या बाबतीत मुंबई सर्वात महाग आहे, त्याखालोखाल बेंगळुरूचा क्रमांक लागतो. दुसरीकडं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, पेये, तेल, फळे आणि भाज्यांसाठी कोलकाता सर्वाधिक परवडणारं आहे, त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो. दिल्लीत दारू आणि तंबाखूजन्य पदार्थ तुलनेनं स्वस्त आहेत.

पर्सनल केअर प्रॉडक्ट्सच्या बाबतीत मुंबई सर्वात महाग आहे, त्या खालोखाल चेन्नई आणि कोलकाताचा क्रमांक लागतो. मुंबईत पर्सनल केअर, वीज, वाहतूक खर्च आणि खानपानाचा खर्च जास्त आहे, तर दिल्लीत घरांचं भाडं सर्वाधिक आहे. इथं वर्षभरात १३ टक्के भाडेवाढ झाली आहे. या यादीत भारतातील दोन शहरं स्वस्त झाली आहेत. यात चेन्नई (१८९) आणि बेंगळुरू (१९५) यांचा समावेश आहे.

आशिया खंडातील सर्वात महागड्या शहरांमध्ये मुंबई २१ व्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली ३० व्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर राहणीमानाच्या खर्चाच्या बाबतीत टॉप-५ शहरांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. त्या खालोखाल सिंगापूर, झुरिच, जिनिव्हा, बासेल, बर्न, न्यूयॉर्क सिटी, लंडन, नासाऊ आणि लॉस एंजेलिस चा क्रमांक लागतो.

Whats_app_banner