Share Market Scam: शेअर मार्केटमध्ये ३० लाख कोटीचा घोटाळा; Exit Poll कंपन्यांसह मोदी, शहांची चौकशी कराः राहुल गांधी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market Scam: शेअर मार्केटमध्ये ३० लाख कोटीचा घोटाळा; Exit Poll कंपन्यांसह मोदी, शहांची चौकशी कराः राहुल गांधी

Share Market Scam: शेअर मार्केटमध्ये ३० लाख कोटीचा घोटाळा; Exit Poll कंपन्यांसह मोदी, शहांची चौकशी कराः राहुल गांधी

Jun 06, 2024 07:11 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार नवा उच्चांक गाठेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ मे रोजी बोलले होते. त्यानुसार कोट्यवधी लोकांनी शेअर विकत घेतले आणि नंतर बाजार कोसळला, याची चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

Congress leader Rahul Gandhi speaks during a press briefing at the AICC headquarters in New Delhi on Thursday.
Congress leader Rahul Gandhi speaks during a press briefing at the AICC headquarters in New Delhi on Thursday. (Raj K Raj/HT Photo)

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय शेअर बाजार नवा उच्चांक गाठेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मे रोजी सांगितले होतं.'लोकसभेच्या निकालाच्या दिवशी ४ जून रोजी भाजप विक्रमी आकडा गाठणार असून तेव्हा शेअर बाजारही नवा विक्रमी उच्चांक गाठेल, असं मी खात्रीपूर्वक सांगतो', असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. मात्र निकालाच्या दिवशी बाजार कोसळला होता. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भारतातील पाच कोटी नागरिकांना गुंतवणुकीचा सल्ला का दिला होता? गुंतवणुकीचा सल्ला देणे हे त्यांचे काम आहे का? शेअरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सेबीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या एका उद्योग समूहाच्या मालकीच्या टीव्ही चॅनल्सना मोदी आणि शहांनी मुलाखती का दिल्या? असा सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत केला आहे. शेअर बाजारातील या मोठ्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.  

‘पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकांना शेअर खरेदी करण्याचे संकेत दिले होते. भारतातील लाखो किरकोळ गुंतवणुकदारांनी टाकलेल्या पैशावर कुणीतरी हजारो कोटी रुपये कमावले आहेत. हा एक मोठा घोटाळा आहे, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्ही याची संयुक्त संसदिय समितीमार्फत चौकशीची मागणी करतोय.’ असं राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले. 

‘गुप्तचर विभागाचे अहवाल, स्वतःची, पक्षाची आकडेवारी यामार्फत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे प्रत्यक्ष निवडणूक निकालाच्या आकडेवारीची माहिती असते. असं असताना ते किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचा सल्ला देत होते. असं यापूर्वी कधी झालं नव्हतं. पंतप्रधानांनी यापूर्वी कधीही शेअर बाजारावर भाष्य केलेलं नाही. शेअर बाजारात तेजी येणार असं पंतप्रधानांनी पहिल्यांदाच, लागोपाठ बोललेले. त्यांचं भाष्य अतिशय मनोरंजक होते’, असं राहुल गांधी म्हणाले. एक्झिट पोल चुकीचे आहेत, याची माहिती पंतप्रधानांकडे होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

१३ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेअर बाजारातील हालचालींचा लोकसभा निवडणुकीशी थेट संबंध जोडू नये, असं म्हटलं होतं. यापूर्वीही बाजारात घसरण झाली आहे. त्यामुळे त्याचा थेट निवडणुकीशी संबंध जोडता कामा नये. असो, काही अफवांमुळे पडझडीला चालना मिळाली असावी. ४ जूनपूर्वी शेअर खरेदी करा. बाजारात तेजी येणार आहे, असं अर्थमंत्र्यांनी एनडीटीव्हीला सांगितले होतं, असं राहुल गांधी म्हणाले. 

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचा सल्ला दिला. हा अदानी प्रकरणापेक्षा मोठा आणि व्यापक मुद्दा आहे. तो अदानी प्रकरणाशी निगडित आहे, पण हा खूप व्यापक आहे. 

Whats_app_banner