Commercial LPG Prices : घरगुती गॅस सिलिंडरचे दर थेट २०० रुपयांनी कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्यानंतर आता केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर १५७ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. याचा फायदा व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्यांनाही होऊ शकणार आहे.
नवे दर १ सप्टेंबरपासून म्हणजे आजपासूनच लागू होणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशातील विविध महानगरातील व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये बदल झाले आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता या शहरांत सिलिंडरचे दर वेगवेगळे आहेत.
मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १६४०.५० रुपये होती, ती आता १४८२ रुपये होईल. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा नवा दर १५२२.५० रुपये असेल. कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडरचा नवा दर १६३६ रुपये असेल.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तेल विक्रेत्या कंपन्यांनी किंमतींचा फेरआढावा घेताना व्यावसायिक एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) च्या दरात कपात केली होती. मात्र, घरगुती गॅसचे दर कायम ठेवले होते. दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किंमतीत २०० रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर लगेचच व्यावसायिक ग्राहकांना दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारनं अचानक सवलतींचा वर्षाव सुरू केल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. यामागे राजकीय अपरिहार्यता असल्याचं बोललं जात आहे. विरोधकांनी तसे आरोपही सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील सरकारविरोधात देश पातळीवर विरोधक एकत्र आले आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीनं अत्यंत हुशारीनं पावलं टाकत भाजपला आव्हान उभं केलं आहे. देशातील वाढत्या महागाईचा मुद्दा आगामी काळात विरोधकांकडून हाती घेतला जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सावध झालं असून दर कपातीचा सपाटा लावला आहे. गॅस सिलिंडर नंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होण्याची शक्यता आहे.