Cochin Shipyard Share Price : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरी सरकारी धोरणांवर अवलंबून असते. सरकारचा एखादा निर्णयही या शेअरचं भविष्य घडवू किंवा बिघडवू शकतो. कोचीन शिपयार्डचे गुंतवणूकदार सध्या याचा अनुभव घेत आहेत. या कंपनीचे शेअर्स आज ४ टक्क्यांनी कोसळले आहेत.
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमधील ५ टक्के हिस्सा ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकण्याची योजना नरेंद्र मोदी सरकारनं जाहीर केली आहे. नॉन-रिटेल गुंतवणूकदारांसाठी आजपासून, १६ ऑक्टोबर २०२४ रोजी आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १७ ऑक्टोबर रोजी ओएफएस सुरू होणार आहे. ओएफएसमध्ये २.५ टक्के बेस ऑफर आहे, तर ग्रीन शू पर्यायाद्वारे अतिरिक्त २.५ टक्के ऑफर उपलब्ध आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कोचीन शिपयार्डमध्ये सरकारचा हिस्सा ७२.८६ टक्के होता. तो आता ५ टक्क्यांनी कमी होणार आहे.
कोचीन शिपयार्डच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ७६.५ टक्क्यांनी वाढ झाली असून ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत तो १७४.२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात ६१.१ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ४७५.९ कोटी रुपयांवरून ७७१.५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
ऑपरेशनल स्तरावर कंपनीचं व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्टायझेशनपूर्वीचे उत्पन्न (एबिटडा) दुपटीनं वाढून १२५ टक्क्यांनी वाढून १७७.३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. या तिमाहीत एबिटडा मार्जिन सुधारून २३ टक्क्यांवर पोहोचलं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते १६.५ टक्के होतं.
कोचीन शिपयार्डची वाढ प्रामुख्यानं जहाज बांधणी व्यवसायामुळं झाली आहे. कंपनीच्या महसुलात मागील वर्षाच्या तुलनेत ६२ टक्क्यांनी वाढ झाली असून तो ५२७ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या एकूण महसुलात जहाज बांधणी व्यवसायाचा वाटा ६८ टक्के आहे.
एकूण विक्रीत ३२ टक्के वाटा असलेल्या कंपनीच्या जहाज दुरुस्ती विभागाचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत ६३ टक्क्यांनी वाढून २४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर मार्जिन मागील वर्षीच्या २४ टक्क्यांवरून ४३ टक्क्यांवर पोहोचलं आहे.
मंगळवारी बाजार बंद होईपर्यंत कोचीन शिपयार्डचे शेअर्स जुलैमध्ये मिळालेल्या २,९७७ रुपयांच्या उच्चांकी पातळीपेक्षा ४४ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, हा शेअर ४३२ रुपयांच्या आयपीओच्या किमतीपेक्षा चौपटीनं वधारला आहे. सध्या (सकाळी ११ वाजता) हा शेअर ३.८५ टक्क्यांनी घसरून १६०७.६० टक्क्यांवर व्यवहार करत आहे.
संबंधित बातम्या