Q3 Results : सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख कोळसा खाण कंपनी कोल इंडियाचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. तिमाही निकाल कंपनीसाठी निराशाजनक आहेत. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर १७.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. असं असलं तरी कोल इंडियानं गुंतवणूकदारांसाठी डिविडंडची घोषणा केली आहे. कंपनीनं प्रति शेअर ५.६० रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
कोल इंडियाचा एकत्रित निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरच्या तिमाहीत १७.५ टक्क्यांनी घटून ८,४९१.२२ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा १०२९१.७१ कोटी रुपये होता. मात्र, मागील तिमाहीशी तुलना करता कंपनीच्या नफ्यात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत खाण कंपनीचा नफा अधिक होता.
संपलेल्या तिमाहीत कोल इंडियाची विक्री २ टक्क्यांनी घसरून ३२३५८.९८ कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा ३३,०११.११ कोटी रुपये होता. तिमाही आधारावर कंपनीच्या विक्रीत १८.७ टक्के वाढ झाली आहे. या आधीच्या तिमाहीत कंपनीची विक्री २७,२७१.३० कोटी रुपये होती.
तिमाहीत एकूण खर्च ४.३ टक्क्यांनी वाढून २६,२०१.५५ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत हा खर्च २५,१३२.८७ कोटी रुपये होता.
कोल इंडियाच्या संचालक मंडळानं लाभांश जाहीर करताना त्याची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. त्यानुसार, शुक्रवार, ३१ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट आहे. या तारखेला ज्याच्या डीमॅट खात्यावर कंपनीचे शेअर्स असतील, त्याला डिविडंडचा लाभ मिळेल. डिविडंडची रक्कम २६ फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल, असं कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं आहे.
कोल इंडियाच्या शेअरनं मागच्या वर्षभरात गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. वर्षभरात कंपनीचा शेअर ९.४० टक्क्यांनी घसरला असून सहा महिन्यात २७ टक्क्यांनी घसरला आहे. आज देखील ही घसरण सुरूच राहिली. आज हा शेअर २.३६ टक्क्यांनी घसरून ३७४ रुपयांवर बंद झाला.
संबंधित बातम्या