Cipla Share Price : तिमाही निकाल चांगले असूनही फार्मा कंपनी सिप्ला लिमिटेडच्या शेअरबाबत तज्ज्ञ साशंक असल्याचे दिसून येत आहे. काही तज्ज्ञांनी कंपनीच्या शेअरची टार्गेट प्राइस कमी केली आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स १५६० रुपयांवर आहेत.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या विश्लेषकांनी सिप्लाच्या शेअरच्या टार्गेट प्राइसमध्ये कपात केली आहे. नुवामानं याआधी शेअरची टार्गेट प्राइस १६६३ रुपये निश्चित केली होती. ती आता १५९३ रुपयांपर्यंत खाली आली आहे. या फार्मास्युटिकल कंपनीला लॅन्रिओटाइड औषधाच्या तात्पुरत्या पुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत हे आव्हान कायम राहिल्यास कंपनीसाठी त्यांचा आर्थिक वर्ष २०२७ चा अंदाज धोक्यात येऊ शकतो, असे ब्रोकरेजने म्हटले आहे.
पुढील दोन वर्षांत सिप्लासाठी दम्याची औषधे सिंबिकॉर्ट आणि क्यूर व्यतिरिक्त आणखी काही पेप्टाइड्सच्या संभाव्य लाँचिंगच्या संधी आहेत, असेही नुवामाच्या विश्लेषकांनी म्हटलं आहे. नोमुरानेही सिप्ला शेअरवर 'न्यूट्रल' रेटिंग कायम ठेवत १५६८ रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.
इन्व्हेस्टकने मात्र १८०० रुपयांच्या टार्गेट प्राइससह कंपनीला 'बाय' रेटिंग कायम ठेवले आहे. यूबीएस सिक्युरिटीजचा अंदाज आहे की हा शेअर १९६० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. मात्र, बँक ऑफ अमेरिकेने १४०० रुपयांच्या कमी टार्गेटसह शेअरला 'अंडरपरफॉर्म' रेटिंग दिले आहे.
फार्मा कंपनी सिप्लाचा नफा चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत १७ टक्क्यांनी वाढून १३०३ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीला १११५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न वाढून ७,०५१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ६,४९० कोटी रुपये होते.
सिप्लाचे एमडी आणि सीईओ (ग्लोबल) उमंग वोहरा यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत महसुलात वार्षिक आधारावर ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्होरा यांनी सांगितले की, कंपनीचा ग्राहक आरोग्य व्यवसाय वार्षिक आधारावर २१ टक्के दराने वाढला आहे. उदयोन्मुख बाजारपेठा आणि युरोपमध्ये कंपनीच्या धोरणामुळे महसुलात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे.