Chinese AI Deepseek Model : चीनची आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनी डीपसीकनं विकसित केलेल्या नव्या एआय चॅटबॉटनंं जगात धुमाकूळ घातला आहे. या एआय मॉडेलमुळं एनव्हिडिया कॉर्पचे सहसंस्थापक जेन्सन हुआंग यांच्यासह जगातील ५०० श्रीमंतांना डीपसीक एकूण १०८ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. डीपसीकमुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.
हुआंग यांच्या संपत्तीत २० टक्क्यांनी घट झाली आहे. एका दिवसात त्यांना २०.१ अब्ज डॉलरचे नुकसान सोसावं लागलं आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार, ओरॅकल कॉर्पचे सहसंस्थापक लॅरी एलिसन यांना २२.६ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. मात्र, ही रक्कम त्यांच्या मालमत्तेच्या केवळ १२ टक्के आहे. डेल इंकचे मायकेल डेल यांना १३ अब्ज डॉलरचं नुकसान झालं. टेक दिग्गज एलन मस्क यांनाही ६.७४ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. लॅरी पेज यांचं ६.३९ अब्ज डॉलरचं, सर्गेई ब्रिन यांना ५.९६ अब्ज डॉलरचं नुकसान झालं. नॅसडॅक कंपोझिट निर्देशांक ३.१ टक्क्यांनी तर एस अँड पी ५०० निर्देशांक १.५ टक्क्यांनी घसरला.
हांगझोऊ स्थित डीपसीक २०२३ पासून एआय मॉडेल विकसित करीत आहे, परंतु या आठवड्याच्या शेवटी ही कंपनी पाश्चिमात्य गुंतवणूकदारांच्या रडारवर आली. कारण, विनामूल्य असलेले या कंपनीचे डीपसीक आर १ चॅटबॉट अॅप जगभरातील डाउनलोड चार्टमध्ये अव्वल स्थानावर होतं. मोठ्या प्रमाणावर आलेल्या युजर्समुळं डीपसीकच्या ऑनलाइन अॅपला आउटेजचा सामना करावा लागला आणि चिनी फोन नंबर असलेल्या वापरकर्त्यांना साइनअप मर्यादित ठेवण्यास भाग पाडलं गेलं.
डीपसीक कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, हे चॅटबॉट विकसित करण्यासाठी केवळ ५.६ दशलक्ष डॉलर्स खर्च आला. सर्वात मजबूत मॉडेल विकसित करण्यासाठी प्रचंड भांडवली खर्चाची गरज असते, असं सिलिकॉन व्हॅलीचं म्हणणं होतं. मात्र, डीपसीकनं ते खोटं पाडलं.
नोव्हेंबर २०२२ मध्ये ओपनएआयनं चॅटजीपीटीचं अनावरण केल्यापासून मेटा प्लॅटफॉर्म्स इंक, अल्फाबेट इंक आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या तथाकथित एआय हायपरस्केलर्सच्या तथाकथित मूल्यांकनानं त्यांच्या मालकांसाठी अब्जावधी डॉलर्सची कमाई केली.
मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्या माहितीनुसार, कंपनी या वर्षी एआयशी संबंधित प्रकल्पांवर ६० अब्ज ते ६५ अब्ज डॉलर खर्च करण्याची योजना आखत आहे. वॉल स्ट्रीटच्या अंदाजापेक्षा ही किंमत जास्त आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, सर्व मोठ्या टेक कंपन्यांमधील भांडवली खर्च २०२५ मध्ये २०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
एनव्हीडिया ही कंपनी एआय बूमची आतापर्यंतची यशस्वी आणि मोठी लीडर आहे. २०२३ च्या सुरुवातीपासून हुआंग यांची संपत्ती सुमारे आठ पटीनं वाढून शुक्रवारपर्यंत १२१ अब्ज डॉलर झाली आहे. याच कालावधीत झुकेरबर्गची संपत्ती ३८५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज डॉलर तर Amazon.com कंपनीचे जेफ बेझोस यांची संपत्ती १३३ टक्क्यांनी वाढून २५४ अब्ज डॉलर झाली आहे.
डीपसीक आपलं मॉडेल विकसित करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीवर आणि टॉप-ऑफ-द-लाइन चिप्सवर अवलंबून राहिली नाही. याचं एक प्रमुख कारण म्हणजे चिनी कंपन्यांना शक्तिशाली जीपीयू किंवा ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्समध्ये मर्यादित प्रवेश होता.
संबंधित बातम्या