चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीच्या संपत्तीत अवघ्या पाच दिवसांत ५७९ कोटींची वाढ, असं काय घडलं?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीच्या संपत्तीत अवघ्या पाच दिवसांत ५७९ कोटींची वाढ, असं काय घडलं?

चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीच्या संपत्तीत अवघ्या पाच दिवसांत ५७९ कोटींची वाढ, असं काय घडलं?

Jun 07, 2024 12:37 PM IST

stock market news : केंद्रातील नव्या एनडीए सरकारचे किंगमेकर म्हणून पुढं आलेले तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीच्या संपत्तीत अवघ्या ५ दिवसांत ५७९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीनं 'या' शेअरमधून पाच दिवसांत ५७९ कोटी कमावले! हे कसं झालं?
चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीनं 'या' शेअरमधून पाच दिवसांत ५७९ कोटी कमावले! हे कसं झालं?

stock market news : लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं देशात पुन्हा एकदा आघाडीचं सरकार येत आहे. नव्या सरकारमध्ये ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असलेले चंद्राबाबू नायडू आणखी एका कारणामुळं चर्चेत आलेले आहेत. चंद्राबाबू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत अवघ्या पाच दिवसांत ५७९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

एफएमसीजी क्षेत्रातील एका कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळं नारा भुवनेश्वरी देवी यांना हा छप्परफाड लाभ झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर शेअर बाजारात घसरण झाली होती. मात्र, एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही. उलट मागील पाच दिवसांत हेरिटेज फूड्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ झाली. जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीतील शेअरहोल्डिंग यासाठी कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे.

हेरिटेज फूड्स लिमिटेडमध्ये तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचा २४.३७ टक्के हिस्सा आहे. अर्थात, त्यांच्याकडं कंपनीतील २,२६,११,५२५ शेअर्स आहेत. या कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळं नारा भुवनेश्वरीच्या संपत्तीत अवघ्या पाच दिवसांत तब्बल ५७९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

हेरिटेज फूड्सच्या शेअरमध्ये किती वाढ?

३१ मे २०२४ रोजी ४०२.९० रुपयांवर बंद झालेल्या हेरिटेज फूड्सच्या शेअरच्या किंमतीत सलग पाच सत्रांमध्ये वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निराशाजनक निकालांमुळं मंगळवारच्या शेअर बाजारातील घसरणीतही एफएमसीजी चा शेअर वधारला. हेरिटेज फूड्सच्या शेअरचा भाव आज तेजीसह उघडला आणि इंट्राडे उच्चांकी स्तर ६५९ रुपये प्रति शेअरवर पोहोचला. हा या शेअरचा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. गेल्या सलग पाच सत्रात हेरिटेज फूड्सच्या शेअरच्या भावात २५६.१० रुपयांची वाढ झाली आहे.

शेअर बाजाराची आजची स्थिती काय?

निवडणूक निकालाच्या दिवशी गडगडलेला शेअर बाजार पुन्हा सावरत आहे. रिझर्व्ह बँकेनं आज पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्याचा परिणामही बाजारात दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (sensex) आता १३०० अंकांनी वधारलेला दिसत आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (Nifty) ३८० अंकांनी वधारलेला आहे.

 

(डिस्क्लेमर: वरील मते आणि शिफारशी वैयक्तिक विश्लेषक, तज्ञ आणि ब्रोकिंग कंपन्यांची आहेत, हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner