
Chanda Kochar : मुंबई उच्च न्यायालयाने आज आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या तातडीच्या सुनावणीस नकार दिला, ज्यांना त्यांचे पती दीपक कोचर यांच्यासह केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी अटक केली होती. खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचे प्रमुख असताना चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. न्यायालयाने कोचर पती पत्नीला 2 जानेवारीला नियमित सुनावणीसाठी कोर्टात येण्याचे निर्देश दिले.
मुंबई न्यायालयाने दिलेल्या तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीला चंदा कोचर आणि दीपक कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांची सध्या तपास यंत्रणा चौकशी करत आहे. कोचरांनी सांगितले की, त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीसीए) पूर्व परवानगीशिवाय अटक करण्यात आली. याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडे आदेश रद्द करण्याचे आणि रिमांडचे आदेश बाजूला ठेवण्याची मागणी केली आहे.
काल व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनाही आयसीआयसीआय कर्ज प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. खटल्यातील आरोपांनुसार,२०१० ते २०१२ दरम्यान व्हिडिओकॉन समूहाला बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांनी न्यूपाॅवर रिन्यूएबल्समध्ये ६४ कोटींची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे.
आयसीआयसीआय बॅकेच्या तत्कालीन समितीमध्ये चंदा कोचर यांचा समावेश होता. या समितीने व्हिडिओकाॅन कंपनीला कर्ज मंजूर केले होते, असा आरोप सीबीआयने केला आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की , चंदा कोचर यांनी अधिकृत पदाचा गैरवापर केला आणि "व्हिडिओकॉनला ३००० रुपये कोटी मंजूर केल्याबद्दल वेणूगोपाल धूत यांच्याकडून अवाजवी फायदा मिळवला.स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील२० बँकांच्या कन्सोर्टियमकडून व्हिडिओकॉनला मिळालेल्या ४० हजार कोटी कर्जाचा हा भाग होता. दरम्यान, चंदा कोचर यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.
संबंधित बातम्या
