vijay kedia : चेन स्मोकर ३० वर्षे जगू शकतो, पण शेअर ट्रेडरचं सांगता येत नाही; प्रत्येकानं वाचायलाच हवी अशी मुलाखत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  vijay kedia : चेन स्मोकर ३० वर्षे जगू शकतो, पण शेअर ट्रेडरचं सांगता येत नाही; प्रत्येकानं वाचायलाच हवी अशी मुलाखत

vijay kedia : चेन स्मोकर ३० वर्षे जगू शकतो, पण शेअर ट्रेडरचं सांगता येत नाही; प्रत्येकानं वाचायलाच हवी अशी मुलाखत

Updated Apr 16, 2024 05:48 PM IST

Vijay Kedia on Stock Market Investment : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी एका म्युझिक व्हिडिओच्या निमित्तानं नुकतीच एक मुलाखत दिली. ही मुलाखत प्रत्येक गुंतवणूकदारानं आवर्जून वाचायला हवी.

चेन स्मोकर ३० वर्षे जगू शकतो, पण शेअर ट्रेडरचं सांगता येत नाही; प्रत्येक गुंतवणूकदारानं वाचायलाच हवी अशी मुलाखत
चेन स्मोकर ३० वर्षे जगू शकतो, पण शेअर ट्रेडरचं सांगता येत नाही; प्रत्येक गुंतवणूकदारानं वाचायलाच हवी अशी मुलाखत

डोळे उघड भाऊ, डोकं वापर भाऊ

१० पैकी ९ ट्रेडर गमावतात पैसे भाऊ

वाटते साधे कोडे तरी, अजिबात तसं नाही

आजवर कोणीही सोडवू शकलं नाही, पक्कं घे जाणून भाऊ

शेअर मार्केट कॅसिनो नाही, त्याकडं व्यवसाय म्हणून बघ

दीर्घकालीन गुंतवणूक हाच वाढीचा एकमेव मार्ग

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सोप्या भाषेत संदेश देणारा हा म्युझिक व्हिडिओ सध्या यूट्यूबवर गाजतो आहे. हा मेसेंजर आणि गायक दुसरा-तिसरा कोणी नसून प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया (Vijay Kedia) आहेत. केडिया यांनी स्वत: हे गीत लिहिलं असून या गाण्यात अभिनय देखील केला आहे. केडिया यांचा हा १७ वा म्युझिक व्हिडिओ आहे.

गुंतवणूक हे केडियाचं वेड असून म्युझिक व्हिडिओ हा छंद आहे. फावल्या वेळात ते असे व्हिडिओ बनवून गेल्या ३० वर्षांपासून मार्केटबद्दल मिळवलेलं ज्ञान लोकांशी शेअर करत आहेत. या व्हिडिओंना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्यांचा सल्ला लोक क्वचितच ऐकतात, अशी कबुली त्यांनी दिली आहे.

केडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या इन्व्हेस्टमेंट फर्मचे संस्थापक असलेले विजय केडिया अनेक सूचीबद्ध भारतीय कंपन्यांमध्ये सर्वात मोठे भागधारक आहेत. अल्फाबेट (गुगल) आणि मेक माय ट्रिपचे शेअर्स विकत घेत त्यांनी अलीकडंच आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश केला आहे. केवळ मौजमजेसाठी आपण या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, असं त्यांनी गुरु पोर्टफोलिओ मालिकेसाठी 'मिंट'शी बोलताना सांगितलं. पाहूया गुंतवणुकीशी संबंधित त्यांची अनुभवी मतं…

तुमच्या पोर्टफोलिओचे स्वरूप कसे आहे?

माझ्या पोर्टफोलिओमध्ये जवळपास ९० टक्के इक्विटी आणि २ ते ३ टक्के सोने-चांदी आहे. सध्या राहत असलेल्या घराव्यतिरिक्त माझ्याकडे काही स्थावर मालमत्ता आहे. ती माझ्या एकूण पोर्टफोलिओच्या अंदाजे ८ टक्के असेल. माझ्या पोर्टफोलिओचा एक मोठा भाग अजूनही शेअर बाजारात आहे.

शेअरबद्दल बोलायचं झाल्यास मी नेहमीच स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये गुंतवणूक केली आहे. सेबीचं स्मॉल आणि मिड कॅपचं वर्गीकरण मला समजत नाही, परंतु मी मोठी धाव घेऊ शकणाऱ्या लहान किंवा मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं पसंत करतो. मागच्या २० वर्षांपासून मी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहे. तेजी असताना शेअर्समधून काही पैसे काढून मी स्थावर मालमत्ता विकत घेतो. नियमित उत्पन्नासाठी शेअर बाजारावर अवलंबून राहायचं नसल्यामुळं मी हा पर्याय निवडला आहे. बाजार कोसळला तरी मला फरक पडता कामा नये असा माझा प्रयत्न असतो. भाड्याच्या उत्पन्नातूनच मला जगायचं आहे. त्यामुळं जेव्हा-जेव्हा मला लाभांश मिळतो, तेव्हा मी शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो किंवा शेअर्समधून पैसे काढू शकतो. केवळ वैविध्य आणण्यासाठी मी माझ्या पोर्टफोलिओचा एक छोटासा भाग सोन्या-चांदीत गुंतवला आहे.

गेल्या वर्षभरात तुमच्या पोर्टफोलिओची कामगिरी कशी होती?

तेजीच्या काळात प्रत्येक गुंतवणूकदार हुशार ठरतो. माझ्या पोर्टफोलिओनेही चांगली कामगिरी केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. मात्र, त्यात माझ्या कौशल्यापेक्षा बाजाराची जादू कारणीभूत होती. नेमका आकडा माहीत पण माझा पोर्टफोलिओ ३० टक्क्यांनी वाढलेला असावा. डिजिटल मनी असल्यानं या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत असं मला वाटतं. मला मीडियातूनच माझ्या पोर्टफोलिओबद्दल जास्त माहिती मिळते.

आंतरराष्ट्रीय इक्विटीमध्ये गुंतवणूक केलीय का?

१५ महिन्यांपूर्वी मी परदेशी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होतो. वर्षभरापूर्वी मी गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेट इंकमध्ये गुंतवणूक केली. सहा महिन्यांपूर्वी मी नॅसडॅक एक्स्चेंजवर 'मेक माय ट्रिप' खरेदी केली. हे दोन शेअर्स सध्या माझ्या आंतरराष्ट्रीय पोर्टफोलिओमध्ये आहेत. हे मी केवळ मजेखातर केलेलं आहे. आरबीआयच्या उदारीकृत रेमिटन्स योजनेनुसार, मी वर्षाला फक्त २,५०,००० डॉलर्सची गुंतवणूक करू शकतो, जी एक छोटी रक्कम आहे. आता नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्यानं मी जास्त पैसे गुंतवू शकतो.

रोख रकमेचं काय?

माझ्या बँक खात्यात कधीही रोख रक्कम नव्हती आणि माझ्याकडं जे काही होतं ते मी गुंतवलं. पुढील दोन ते तीन महिन्यांत मोठा खर्च लागेल असं दिसलं की तेवढीच रक्कम मी बाजूला ठेवतो. नाहीतर मी पैशाचा शत्रू आहे. बँकेत रोकड असली की मला झोप लागत नाही. जेव्हा एखादा आश्वासक स्टॉक दिसतो, तेव्हा मी ताकदीनं गुंतवणूक करतो. सर्व कॅश लावून टाकतो. त्यातून मला आनंदही मिळतो. मी जे काही विकत घेतो, ती माहिती कुठल्या ना कुठल्या प्रकारे लीक होतेच. ही माहिती ब्रोकर लीक करतो की अन्य कोणी हे मला माहीत नाही. ही एक अडचणच आहे. मी १ ते २ दिवसात सर्व काही विकत घेण्याचा प्रयत्न करतो, मग शेअरला हायर सर्किट लागलं तरी थांबत नाही.

इंटरनेटचा सल्ला घेणाऱ्यांना काय सांगाल?

भूगोलाच्या शिक्षकाकडून इतिहासाचे धडे घेऊ नका. कुणाचं अनुकरण करायचंच असेल तर २० ते ३० वर्षांहून अधिक काळ बाजारात असलेल्या व्यक्तीचा अनुभव ऐका. तुम्ही एखाद्या नवख्या व्यक्तीला गुरू करून बसलात तर तुम्ही सुरुवातीपासूनच हरला म्हणून समजा. जे स्वत: बाजारात नवखे आहेत आणि इतरांना शिकवून पैसे कमवतात. त्यांच्यापासून सावध राहा. शेअर बाजाराचा व्यवसाय म्हणून विचार करा. तुमची जशी समज असेल त्याच प्रमाणात बाजार तुम्हाला परतावा देतो. तुम्ही शेअर बाजाराला जुगार मानत असाल तर तो तुमच्यासाठी जुगार ठरेल. तुम्ही रातोरात कोट्यवधी होऊ शकणार नाही. हा दीर्घकालीन खेळ आहे.

स्मॉल व मिड कॅपमध्ये घसरणीचे संकेत सेबीने दिलेत. काय वाटतं?

पहिली गोष्ट म्हणजे सर्व स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये घसरण आहे हे खरं नाही. बाजारात सुमारे ५,००० मिड आणि स्मॉल कॅप शेअर्स आहेत. अर्थात, बहुतेक शेअर निरर्थक आहेत हे मान्य आहे. गेल्या महिन्यात जेव्हा बाजाराला मोठा फटका बसला, तेव्हा अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या अधिक घसरल्या. माझ्या बऱ्याच शेअर्समध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. पुढं अशा प्रकारचे आणखी अडथळे आपल्याला पाहायला मिळतील. बाजारपेठेत नव्यानं प्रवेश करणारे हा गोंधळ घालत आहे, पण त्याला घाबरण्याचं कारण नाही. फक्त योग्य स्टॉक निवडण्याची गरज आहे. ऑपरेटर्स घोलमाल करून शकणार नाहीत अशा मूलभूत बाबतीत उत्तम असलेल्या कंपन्यांची निवड करा. मला घसरणीची चिंता नाही कारण हा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा अविभाज्य भाग आहे.

तुमचा पोर्टफोलिओ किती प्रवाही आहे?

स्ट्रेस टेस्ट करून मला कोणताही ताण घ्यायचा नाही. मी महाभारतातील अभिमन्यूसारखा आहे. त्याला फक्त (चक्रव्यूहात) प्रवेश कसा करायचा हे माहीत असतं, पण त्यातून बाहेर कसं पडावं हे त्याला माहीत नसतं. माझं बाहेर पडणं हे कंपनी आणि बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, माझ्यावर नाही. खरंतर, लिक्विडिटी नसणं हे माझ्यासाठी फायद्याचं ठरलं आहे. लार्ज कॅप्समध्ये मी जास्त काळ गुंतवणूक करू शकत नाही कारण त्या खूप लिक्विड स्वरूपाच्या असतात. माझ्या पोर्टफोलिओचे स्वतःपासून संरक्षण करण्यासाठी, मी कमी लिक्विड मिड आणि स्मॉल-कॅपमध्ये गुंतवणूक करणे अधिक पसंत करतो.

बाजारात नव्यानं येणाऱ्यांसाठी काही टिप्स

बाजारात नव्यानं येणाऱ्यांनी म्युच्युअल फंडांपासून सुरुवात करावी. शेअरची निवड करणं ही दुसऱ्याकडून शिकण्याची गोष्ट नाही. हे केस कापण्यासारखं आहे. बघून शिकता आलं असतं तर आत्तापर्यंत आपण केस कापायला शिकलो असतो. पण तसं होत नाही. हे तुम्हाला स्वत:च करावं लागेल, तरच तुम्ही शिकू शकाल.

एफ अँड ओ (फ्युचर्स अँड ऑप्शन) ट्रेडर्सला काय सांगाल?

फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये ट्रेड करणाऱ्यांना सांगण्यासारखं माझ्याकडं काही नाही. ते येणारा काळच सांगेल. गुंतवणूकदारांना या सर्व अल्पकालीन गोष्टींपासून दूर राहण्याचा इशारा देणारी किमान १० गाणी मी लिहिली आहेत. कोणी ऐकत नाही. विमानतळावर मला एक जण भेटला. 'ओपन युअर आयज ब्रो…' हे माझं गाणं आवडल्याचं त्यानं सांगितलं. मात्र, दुसऱ्याच सेकंदाला त्यानं वायदे बाजाराच्या टिप्स विचारायला सुरुवात केली. मी त्याच्यासमोर हात जोडले. स्वर्गात जायचं असेल तर आधी मरावं लागतं. शिक्षण कठीण असतं. पैसे कमावणं आणि पैसे टिकवून ठेवणं ही वेगळी गोष्ट आहे. एफ अँड ओचा फायदा झालेले बहुतेक लोक दलालच असतात. तुम्ही धूम्रपान करत असाल तर २०-३० वर्षांत तुमचा मृत्यू होऊ शकतो, पण जर तुम्ही एफ अँड ओ करत असाल तर उद्याही मरू शकता. हे लक्षात ठेवा!

 

(डिसक्लेमर: हा लेख केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. अनुकरण करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner