Share market news : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) या कंपनीनं जाहीर केलेले बोनस शेअर्स आज गुंतवणूकदारांच्या खात्यावर झळकले आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीचा शेअर आज ६ टक्क्यांनी झेपावला आहे. बोनस शेअर्समुळं अर्ध्या किंमतीवर आलेला शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे.
सीडीएसएलनं १:१ अशा प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी २४ ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ गुरुवारी व्यवहार बंद होताना ज्या भागधारकांच्या डीमॅट खात्यांमध्ये सीडीएसएलचे शेअर्स होते, त्यांना त्या प्रमाणात मोफत शेअर्स मिळणार आहेत. या तारखेच्या आधीच CDSL शेअर्स नफ्यात व्यवहार करत आहेत. गेल्या १२ व्यवहार सत्रांपैकी १० सत्रांमध्ये हा शेअर वाढला आहे.
गेल्या आठवड्यात शेअरधारकांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) बोनस देण्यास मान्यता दिली होती. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डीमॅट खात्यांच्या एकूण संख्येच्या बाबतीत सीडीएसएलनं बाजारपेठेतील हिस्सा मिळवणं सुरूच ठेवलं आहे. जुलै २०२४ मध्ये एकूण डिमॅट खात्यांची संख्या १६७ दशलक्ष झाली.
एकूण आणि वाढीव डिमॅट खात्यांच्या बाबतीत सीडीएसएची प्रतिस्पर्धी एनएसडीएलनं (NSDL) बाजारातील हिस्सा अनुक्रमे ४२० आणि ५१० बेसिस पॉइंट्सनं गमावला आहे. डीमॅट खात्यांचा विचार केल्यास सीडीएसएलचा अजूनही ७७ टक्के मार्केट शेअर आहे. वाढीव खात्यांमध्ये त्याचा बाजार हिस्सा जूनमधील ९० टक्क्यांवरून वाढून जुलै महिन्यात ९१ टक्के झाला आहे.
CDSL चे शेअर्स एनएसईवर आता (सकाळी ११.४० वाजता) ९.१७ टक्क्यांनी वाढून १५८२ वर ट्रेड करत आहेत. गेल्या एका महिन्यात स्टॉक २८ टक्क्यांनी वाढला आहे.