Castrol India Dividend News : कॅस्ट्रॉल इंडियाचा शेअर मंगळवारी ७ टक्क्यांनी वधारून १९३.७५ रुपयांवर पोहोचला. डिसेंबर २०२४ तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली. डिसेंबर तिमाहीत कंपनीला २७१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तिमाही निकालानंतर कंपनीनं गुंतवणूकदारांना लाभांशाची भेट दिली आहे.
कॅस्ट्रॉल इंडियानं प्रति शेअर ९.५० रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशात ४.५० रुपयांच्या विशेष लाभांशाचा समावेश आहे. कंपनीनं अंतिम लाभांशासाठी मंगळवार, १८ मार्च २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
कॅस्ट्रॉल इंडियाचा तिसऱ्या तिमाहीतील नफा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी आणि सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढला आहे. कॅस्ट्रोल इंडियाच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा २८४ रुपये आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा उच्चांक गाठला होता. या उच्चांकी पातळीवरून ४० टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतरही किरकोळ गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्सवर विश्वास दाखवत गुंतवणूक केली आहे.
जून तिमाहीअखेर कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या ३.८४ लाख होती आणि त्यांचा कंपनीत १५.३७ टक्के हिस्सा होता. तो आता वाढला आहे. डिसेंबर २०२४ तिमाहीअखेर कॅस्ट्रॉल इंडियाचे ४.९ लाख किरकोळ गुंतवणूकदार होते आणि कंपनीत त्यांचा १६.८८ टक्के हिस्सा आहे.
म्युच्युअल फंडांनी गेल्या दोन तिमाहीत कंपनीतील आपला हिस्सा ५० बेसिस पॉईंटनं (०.५० टक्के) कमी केला आहे. म्युच्युअल फंडांचा कंपनीत आता २.१ टक्के हिस्सा आहे. जूनमध्ये तो २.६ टक्के होता. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीची कॅस्ट्रॉल इंडियामध्ये १० टक्के हिस्सेदारी आहे.
संबंधित बातम्या