कॅनरा बँकेचा निव्वळ नफा ४ हजार कोटींच्या पुढे; आता शेअर मार्केटमधील कागिरीवर लक्ष
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  कॅनरा बँकेचा निव्वळ नफा ४ हजार कोटींच्या पुढे; आता शेअर मार्केटमधील कागिरीवर लक्ष

कॅनरा बँकेचा निव्वळ नफा ४ हजार कोटींच्या पुढे; आता शेअर मार्केटमधील कागिरीवर लक्ष

HT Marathi Desk HT Marathi
Oct 29, 2024 05:02 PM IST

Canara Bank Quarterly Result: कॅनरा बँकेनं दुसऱ्या तिमाहीचे निकाल घोषित केले असून त्यानुसार बँकेला तब्बल ४०१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तसंच, एनपीएमध्ये देखील घट झाली आहे.

कॅनरा बँक
कॅनरा बँक

Canara Bank Net Profit : सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक असलेल्या कॅनरा बँकेने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर बँकेच्या निव्वळ नफ्यात ११ टक्के वाढ झाली आहे. एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार जुलै ते सप्टेंबर दरम्यान बँकेला एकूण ४०१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कॅनरा बँकेला गेल्या वर्षी याच तिमाहीत ३६०६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

बँकेच्या तिमाही निकालाचे सकारात्मक पडसाद आज शेअर बाजारात उमटले. गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेला बँकेचा शेअर आज सावरला. त्यात दिवसभरात ३.०७ टक्क्यांची वाढ झाली. आज बीएसईवर बँकेचा शेअर १०१.६५ रुपयांच्या पातळीवर उघडला. परंतु दिवसभरात तो ३.४७ टक्क्यांनी वाढून १०४.६५ रुपयांवर पोहोचला. बाजार बंद होताना बीएसईवर बँकेचा शेअर १०३.७० रुपयांवर व्यवहार करत होता. 

मागच्या वर्षभरात ३५ टक्के परतावा

शेअर बाजारातील कामगिरीच्या बाबतीत गेल्या वर्षभरात कंपनीची स्थिती फारशी उत्साहवर्धक नव्हती. बँकेच्या शेअरनं गेल्या वर्षभरात ३५ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यांत शेअरच्या किंमतीत १६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

बँकेचं उत्पन्न ३५ हजार कोटींच्या जवळ

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून ३४,७२१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या कालावधीत बँकेचे व्याज उत्पन्न २९,७४० कोटी रुपये आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते २६,८३८ कोटी रुपये होते.

एनपीएमध्ये घट

कॅनरा बँकेच्या दृष्टिकोनातून चांगली बाब म्हणजे एनपीएमध्ये घट झाली आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत बँकेचा एकूण एनपीए ३.७३ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी तो ४.७६ टक्के होता. निव्वळ एनपीए किंवा बुडीत कर्जे १.४१ टक्क्यांवरून ०.९९ टक्क्यांवर आली आहेत.

३० सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार या सरकारी बँकेच्या एकूण ९६५८ शाखा होत्या. यामध्ये ३११५ ग्रामीण शाखा, २७७८ निमशहरी आणि १९१८ शहरी आणि १८४७ मेट्रो शाखांचा समावेश आहे. सध्या बँकेची लंडन, न्यूयॉर्क, दुबई आणि आयबीयू गिफ्ट सिटी येथे प्रत्येकी एक शाखा आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner