कॅनरा रोबेको एएमसी आयपीओ : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेची कंपनी कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंटचा आयपीओ मार्चपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. सत्यनारायण राजू यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आयपीओ येण्याची शक्यता आहे. कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंट कंपनीला (एएमसी) आयपीओसाठी लवकरच अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
म्युच्युअल फंड कंपनीत कॅनरा बँकेचा ५१ टक्के हिस्सा आहे. आयपीओच्या माध्यमातून १३ टक्के हिस्सा विकण्याची कंपनीची योजना आहे. गेल्या डिसेंबरमध्ये कॅनरा बँकेने आपल्या म्युच्युअल फंड उपकंपनीला प्राथमिक समभाग विक्रीद्वारे सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता दिली होती. लिस्ट झाल्यानंतर शेअर बाजारात लिस्ट होणारी ही पाचवी म्युच्युअल फंड कंपनी ठरेल. यापूर्वी एचडीएफसी एएमसी, निप्पॉन लाइफ इंडिया एएमसी, यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत.
कॅनरा बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या बुडीत कर्जाच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सत्यनारायण राजू म्हणाले की, तिसऱ्या तिमाहीत सुमारे ३००० कोटी रुपये आणि चौथ्या तिमाहीत तेवढीच रक्कम वसूल होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या तिमाहीत बँकेने २,९०५ कोटी रुपयांची वसुली केली आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्सबाबत राजू म्हणाले की, बँकेने जुलैमध्येच १०,००० कोटी रुपये उभे केले आहेत आणि ते उभारण्याच्या प्रक्रियेत आहेत. चालू आर्थिक वर्षात बँक दीर्घ मुदतीच्या स्ट्रक्चरल बाँडच्या माध्यमातून अधिक निधी उभारण्याची शक्यता नाही.
कॅनरा बँकेचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ११ टक्क्यांनी वाढून ४,०१५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ३,६०६ कोटी रुपये होता. या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न ३१,४७२ कोटी रुपयांवरून ३४,७२१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.