'मॅरिको' उद्योगसमूहाचे संचालक हर्ष मारीवाला यांच्या 'असेंट फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख प्रियांजली मारीवाला यांनी मुंबईतील तब्बल ६५ कोटी २५ लाख रुपये किमतीचा एक आलिशायन फ्लॅट खरेदी केल्याचे वृत्त आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘सनटेक सिग्नेचर आयलँड’ या इमारतीत हा फ्लॅट असून विक्रेते स्टारलाइट सिस्टीम्स (आय) प्रायव्हेट लिमिटेड आहेत. या फ्लॅटचा आकार एकूण ८ हजार २९२ चौरस फूट एवढा आहे. यात मारीवाला यांना असून चार कार पार्किंगच्या जागा मिळाल्या आहेत. या फ्लॅटची नोंदणी प्रक्रिया १ जुलै २०२४ रोजी पार पडली आहे.
प्रियांजली या मॅरिको उद्योगसमूहाचे अध्यक्ष हर्ष मारीवाला यांनी स्थापन केलेल्या ‘असेंट फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचं नेतृत्व करतात. असेंट फाऊंडेशन या संस्थेतर्फे नवोद्योजकांना ओळखून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचा उद्योग वाढवण्यामध्ये हातभार लावण्याचे काम केले जाते.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘सिग्नेचर आयलंड’ गृहसंकुलात दोन प्रकारचे फ्लॅट तयार करण्यात आले आहेत. मोठ्या फ्लॅटचा आकार हा ११ हजार चौरस फूट असून लहान फ्लॅटचा आकार ७ हजार चौरस फूट एवढा आहे. ‘सिग्नेचर आयलंड हे अल्ट्रा लक्झरी निवासी संकुल असून बिल्डरद्वारे केवळ निमंत्रण देऊन बोलावण्यात आलेल्या ग्राहकांनाच येथील फ्लॅट खरेदी करता येतात.
प्रियांजली मारीवाला यांनी विकत घेतलेल्या ८ हजार २९२ चौरस फूट फ्लॅटसाठी एकूण ३ कोटी २० लाख रुपये राज्य शासनाचे मुद्रांक शुल्क भरले आहे.
‘सिग्नेचर आयलंड’ कंपनीच्या वेबसाइटनुसार, हे अपार्टमेंट मॅनहॅटन, सिंगापूर आणि हाँगकाँग येथील इमारतींवरून प्रेरित आहेत. मध्यवर्ती भागात असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra-Kurla Complex) पासून काही अंतरावर असलेल्या या निवासी प्रकल्पात मुंबईतील अनेक बडे उद्योगपती आणि बॉलिवूड स्टार्सची घरे आहेत.
अभिनेत्री सोनम कपूरने २०१५ मध्ये सनटेक सिग्नेचर आयलंडमध्ये डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केला होता. पाच वर्षानंतर डिसेंबर २०२० मध्ये तिने हा फ्लॅट ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला होता. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनेही या कॉम्प्लेक्समध्ये ५,५०० स्क्वेअर फूट आकाराचे लक्झरी अपार्टमेंट २१ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
शहरातील ऑफिसची गर्दी कमी करण्यासाठी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने १९७० च्या दशकात बीकेसीची कल्पना मांडली होती. सुरवातीला तेल कंपन्या, वाणिज्य दूतावास आणि बँकांनी या बीकेसीमध्ये येऊन कार्यालये उघडली होती. मात्र २०१० मध्ये भारत डायमंड बोर्स (बीडीबी) या जगातील सर्वात मोठ्या डायमंड एक्स्चेंजने भारतातील हिरे व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी येथून कामकाज सुरू केले. यामुळे या भागात कामकाज सुरू करण्यासाठी इतर अनेक संबंधित कंपन्या बीकेसीकडे आकर्षित झाल्या होत्या. सध्या बीकेसीमध्ये भारतातील मोठ्या बँका, विमा कंपन्या आणि इतर सरकारी संस्थांची कार्यालये आहेत.