Business Ideas : How to dress; वेश नसावा कधीही बावळा...
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : How to dress; वेश नसावा कधीही बावळा...

Business Ideas : How to dress; वेश नसावा कधीही बावळा...

HT Marathi Desk HT Marathi
Jun 13, 2024 01:27 PM IST

Business Ideas : ‘व्यावसायिकाने आपल्या ग्राहकांशी आणि कर्मचाऱ्यांशी नेहमी सौजन्याने बोलावेच, परंतु स्वतःचे व्यक्तीमत्वही रुबाबदार आणि चेहरा हसतमुख ठेवण्याची काळजी घ्यावी’, असे माझे बाबा कायम सांगत. त्या उपदेशाचे महत्त्व मी आजही विसरत नाही.

Business Tips - Importance of dressing in Business
Business Tips - Importance of dressing in Business

 

धनंजय दातार

दुबई एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या फ्लाईट केटरिंग विभागाला मालपुरवठा करण्याचे एक मोठे कंत्राट आम्हाला मिळू पाहात होते. त्याबाबत पूर्वचर्चा करण्यासाठी त्यांच्या उच्चाधिकाऱ्यांनी आम्हाला भेटीला बोलवले होते. मी आणि बाबा त्या मीटिंगला गेलो. एरवी माझ्या कपड्यांबाबत मतप्रदर्शन न करणाऱ्या बाबांनी त्या दिवशी मात्र मला नेहमीचा वेश बदलण्याची सूचना केली. बेलबॉटम पँट आणि टी-शर्टच्या जागी नॅरो-बॉटम पँट व फुल स्लीव्हज शर्ट घालायला लावला. माझ्याकडे कोट नव्हता, पण शर्टवर टाय घालून मी मीटिंगला गेलो. बैठक संपवून बाहेर पडल्यावर बाबा म्हणाले, “तुला नेहमीचा पोशाख बदलायला लावण्यामागे विशिष्ट कारण आहे. व्यावसायिकाने पोशाखाचे भान ठेवणे गरजेचे असते. बिझनेस मीटिंग्जना जाताना टाय-इनशर्ट-पॉलिश्ड बूट असा रुबाबदार पोशाखच घालावा म्हणजे त्याचा एक वेगळा प्रभाव पडतो.”

बाबांचे जाणवून दिलेले हे टापटिपीचे महत्त्व मी आजही आमच्या समूहातील सहकाऱ्यांना समजावून सांगतो. आमच्याकडे अगदी साधेपणाने राहणारा एक कर्मचारी होता. एकदा मी त्याला एका ग्राहक कंपनीतून येणे रकमेचा चेक आणायला पाठवले. तो बऱ्याच उशिराने परत आला. कारण विचारता तो म्हणाला, “त्या कंपनीतील लोकांनी मला तासभर बसवून ठेवले, पण शेवटी चेक दिलाच नाही.” मी एकदा त्याला आपादमस्तक न्याहाळले आणि म्हणालो, “तू पँटमध्ये शर्ट न खोचता आणि पायात स्लीपर घालून क्लायंट कंपनीत गेलास. तुझ्या अवतारावरुन त्यांना तू कदाचित ऑफिसबॉय वाटला असावास. एक काम कर. उद्या पायात पॉलिश केलेले बूट, पँटमध्ये इन-शर्ट, कमरेला पट्टा आणि गळ्यात टाय अशा पोशाखात पुन्हा तेथे जा आणि त्यांच्या वागणुकीतील बदल स्वतः अनुभव.” तो माणूस दुसऱ्या दिवशी मी सांगितल्यानुसार पोशाख करुन गेला आणि खरोखर १५ मिनिटांच्या आत त्याच्या हातात चेक पडला.

व्यावसायिक शिष्टाचार (बिझनेस एटिकेट्स) आजच्या काळात खूप महत्त्वाचे ठरतात. पोशाखाप्रमाणे आपल्या व्यक्तीमत्त्वाची छाप पडण्यासाठी आणखीही काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. कार्यालयीन बैठकीत जांभया देणे, चर्चा सुरु असताना मोबाईलवर आलेला कॉल घेणे, कॉर्पोरेट डिनरप्रसंगी आकंठ खाणे-पिणे, चारचौघांत दात कोरणे, नाक-कान-डोके खाजवणे, समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेण्याअगोदरच अस्वस्थता किंवा नापसंती दाखवणारे हावभाव करणे अशा छोट्या गोष्टीही आपला प्रभाव पडण्यास मारक ठरतात. एक छान सुभाषित मी नेहमी आठवणीत ठेवतो.

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्।

सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्॥

(अर्थ – मळकट कपडे घालणारा, अस्वच्छ दात असलेला, सदैव खादाड, कठोर बोलणारा, सूर्योदयानंतर झोपणारा (आळशी) अशा माणसाच्या हातावर अगदी लाभदायक चिन्हे व भाग्यरेषा असल्या तरी लक्ष्मी त्याला सोडून जाते.

व्यसने नुकसान घडवतात...

एका कंपनीला मालपुरवठा करण्यासाठी मी निविदा भरली होती. मी लावलेला दर त्या कंपनीला जरा जास्त वाटला. त्याचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी मला भेटीला बोलवले. चर्चेत त्या कंपनीच्या अधिकाऱ्याने मला सांगितले, की आणखी एका स्पर्धक पुरवठादाराने खूप कमी किंमतीत निविदा भरली असल्याने मी तेवढाच दर ठेवला तर काही विचार होऊ शकेल. अर्थात एका ठराविक मर्य़ादेखाली दर कमी करणे मला शक्य नसल्याने मी नम्रपणे नकार दिला आणि निघून आलो. आपल्या रोखठोक बोलण्याने हे कंत्राट जवळपास आपल्या हातून गेलेच, असे समजून मी तो विषय मनातून काढून टाकला.

आश्चर्य म्हणजे काही दिवसांनी त्या कंपनीने ते कंत्राट माझ्या कंपनीला देत असल्याचे आपणहून कळवले. मी चकित होऊन हा बदल कसा घडला, असे विचारले असता तो अधिकारी म्हणाला, “तुमचे स्पर्धक पुरवठादारसुद्धा चर्चेसाठी आले होते, पण त्यांना सिगरेटचे व्यसन आहे. तासभराच्या बैठकीत ते तीनदा बाहेर जाऊन सिगरेट ओढून आले. त्यांच्या तोंडाला धूम्रपानाचा इतका उग्र वास येत होती, की मला पुढे त्यांच्याशी संभाषण करणे मुश्किल झाले. आम्ही असा विचार केला, की जो आपल्या सवयींबाबत इतका निष्काळजी असेल त्याच्याकडून व्यवहारात शिस्तीची अपेक्षा कशी धरावी.”

पान, गुटखा, तंबाखू, सिगरेट किंवा सुपारी सेवनासारख्या सवयी ताब्यात न ठेवल्यास किंवा अगदी बैठकीत च्युईंगम चघळत राहिल्यास चारचौघात आपली किंमत कमी होते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

 

Whats_app_banner