व्यवसाय फायद्यात चालू लागल्यावर माझ्याही अंगावर पैशाचे बाळसे चढू लागले. हॉटेलांमधील शाही मेजवान्या, चमचमीत खाणे, उशिरापर्यंत जागणे याचे आकर्षण वाटू लागले. याच समृद्धीच्या खुणा भविष्यात आरोग्याच्या समस्या ठरतील याची मला तेव्हा कल्पना नव्हती. त्याच दरम्यान मला वारंवार सर्दी होऊ लागली आणि ती चार दिवसांत बरी न होता तीन-तीन आठवडे टिकू लागली. त्यामुळे चेकअप करुन घेण्याच्या उद्देशाने मी एकदा डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला तपासले आणि काही औषधे लिहून दिली. त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. मग माझी रवानगी कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे झाली. त्यांनी एकामागोमाग एक तपासण्या सुरू केल्या आणि म्हणाले, की बहुतेक नाकाचे हाड वाढल्याने तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल. आपल्याला त्या हाडावर शस्त्रक्रिया करुन ते कापावे लागेल.
शस्त्रक्रियेचे नाव ऐकताच मी दचकलो आणि काहीही न बोलता घरी परत आलो. पत्नीला सर्व सांगून तिचा सल्ला विचारला. माझी भयभीत अवस्था बघून पत्नीने दिलासा दिला. ती म्हणाली, की इतके घाबरण्याचे कारण नाही. शस्त्रक्रिया टाळून उपचार करता येतील का, याचा सल्ला अन्य डॉक्टरांकडून घेऊया. त्याप्रमाणे मी एका जनरल फिजिशियनकडे गेलो. तपासण्यांचे रिपोर्ट त्यांच्यापुढे ठेऊन समस्या सांगितली. डॉक्टर विचारपूर्वक ऐकत होते. मध्येच त्यांनी मला विचारले, की ‘तुम्ही धूम्रपान करता का?’ मी ओशाळा होऊन होकारार्थी उत्तर दिले. त्यावर डॉक्टरांनी सांगितले, की ही सर्दी नाकातले हाड वाढल्याने होत नसून धूम्रपानामुळे बळावत आहे. त्यांनी मला धूम्रपान तत्काळ थांबवण्याचा सल्ला दिला आणि काही औषधे लिहून दिली. त्यांचे निदान अचूक होते. आठ दिवसांतच माझी सर्दी निघून गेली. मी डॉक्टरांचे आभार मानायला गेलो तेव्हा त्यांनी अगदी वाजवी फी घेतली आणि गंभीरपणे एक इशारा दिला, ‘दातार साहेबऽ आताच सिगरेट सोडा अन्यथा लवकर जग सोडाल.’ मी डॉक्टरांचा सल्ला मानला आणि त्या दिवसापासून सिगरेट सोडली ती कायमचीच.
पण या प्रसंगातून आणखीही एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे सेकंड ओपिनियन फार महत्त्वाचे असते. माझ्या वडिलांना व्यवसायाचा काहीही अनुभव नसताना त्यांनी दुबईत दुकान सुरू करण्याचे धाडस केले होते. एकदा मी त्यांना हे कसे साधलेत, असे विचारल्यावर ते म्हणाले, “त्यात काहीच अवघड नाही. आपण दुसऱ्या शहरात गेल्यावर परिसराची माहिती नसेल तर हवा तो पत्ता चार माणसांना विचारत जातो. व्यवसायात तसेच आहे. आपल्याला माहिती नसेल तर प्रथम एका व्यक्तीला उपाय विचारायचा, पुढे दुसऱ्या व्यक्तीकडून त्याची खातरजमा करून घ्यायची. फरकाच्या मुद्यांवर विचार करायचा. अशाच पद्धतीने माणूस शिकत जातो.”
बाबांचा सल्ला लक्षात ठेऊन मी आजही माझ्या व्यावसायिक समस्या कुटूंबापुढे आणि संबंधित क्षेत्रातील जाणकारांपुढे मांडतो. ते काय सांगतात याकडे माझे लक्ष असते. मी व्यवसायातील कौशल्ये बड्या उद्योगपतींकडून अथवा निव्वळ बिझनेस मॅनेजमेंटची पुस्तके वाचून शिकलो नाही. ते बारकावे मला मनमोकळेपणाने शिकवले ते छोट्या व्यावसायिकांनी. मी माझ्या समस्या त्यांच्यापुढे मांडत गेलो आणि त्यांनी मला उत्तम मार्गदर्शन केले.
एक घटना सांगतो. मी घाऊक विक्रीचा (होलसेल ट्रेडिंग) व्यवसाय सुरू केला तेव्हा या क्षेत्रात अनुभवी असलेल्या एका व्यक्तीला सल्ला विचारला असता ते गंभीरपणे म्हणाले, “दातार, तुम्ही किरकोळ विक्री (रीटेल ट्रेडिंग) व्यवसायात मुरलेले असलात तरी घाऊक विक्रीचे क्षेत्र तुमच्यासाठी नवीन आहे. यातील खाचाखोचा समजून घेण्यास वेळ लागेल. पाऊल टाकण्यापूर्वी विचार करा.” त्या सल्ल्यामुळे मीही पाय मागे घेण्याच्या मनस्थितीत होतो, पण बाबांच्या शिकवणुकीनुसार मी एकाच्या सांगण्याची शहानिशा दुसऱ्याकडून करुन घ्यायचे तत्त्व पाळायचे ठरवले. मी आणखी एका जाणकारांचा सल्ला घेतला. ते म्हणाले, “बिनधास्त सुरवात करा. फार काय होईल तर पहिल्या वर्षांत ठेच लागेल, क्वचित निराशाही पदरी पडेल, पण त्यातून काही तरी शिकालच ना? किरकोळ विक्री करणाऱ्याला घाऊक विक्री जमणार नाही असे कसे होईल?” मी विचारांती धाडस करुन नवा व्यवसाय सुरू केला. आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्याच वर्षी मला दणदणीत नफा झाला. कालांतराने मी समव्यावसायिकांशी गोड बोलून त्याही धंद्यातील बारकावे समजून घेतले.
मित्रांनो ‘पाचामुखी परमेश्र्वर’ ही आपल्याकडची म्हण मुळीच खोटी नाही. म्हणूनच अडचणीत असताना सल्ल्यासाठी एकाच व्यक्तीवर विसंबून राहण्यापेक्षा नेहमी सेकंड ओपिनियन घेत राहा.
संबंधित बातम्या