Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

HT Marathi Desk HT Marathi
May 16, 2024 07:03 PM IST

Business Ideas : श्रीमंताभोवती भरपूर मित्रांचे कोंडाळे असणे यात आश्चर्य नसून ही पैशाची किमया असते. मुंग्यांना जसा साखरेचा वास लागतो तसेच स्वार्थी लोकांना दुसऱ्याकडच्या पैशाचा अचूक सुगावा लागतो. पण गंमत म्हणजे संकटकाळी या भोजनभाऊ मित्रांतील कुणीही उपयोगी पडत नाही.

Business Ideas by Dhananjay Datar
Business Ideas by Dhananjay Datar

 

 

धनंजय दातार

मी एकदा ‘टॅक्सी नंबर 9211’ नावाचा एक हिंदी चित्रपट बघत होतो. त्याच्या कथासूत्रात जय मित्तल (भूमिका – जॉन अब्राहम) हा एका उद्योगपतीचा खुशालचेंडू मुलगा वडिलांचे निधन झाल्यावरही घरच्या व्यवसायाकडे गंभीरपणे न बघता मित्र-मैत्रिणींसमवेत पार्ट्या आणि ऐशआराम करण्यात रमलेला असतो. पण जयला वडिलांच्या संपत्तीतील काहीही मिळणार नाही, हे लक्षात येताच सगळे मित्र आणि अगदी जवळची मैत्रीणही त्याला सोडून जातात. त्याक्षणी जयचे डोळे उघडतात. तो चित्रपट बघताना मला अमीनभाई नावाच्या एका परिचीत गृहस्थांच्या दुर्दैवी कहाणीतील साधर्म्य वारंवार आठवत होते.

लहानपणापासून श्रीमंती उपभोगल्याने अमीनभाईंची वृत्ती खर्चाबाबत बेफिकीर होती. मित्रमंडळींना मेजवान्या देणे, गप्पांची मैफल रंगवणे आणि तंगीत असेल्यांना पैशांची मदत करणे यात त्यांना आनंद वाटे. आपल्याकडे ‘सब दिन जात न एकसमान’ (सगळेच दिवस सारखे नसतात), अशी एक म्हण आहे. अमीनभाईंनाही याचा पडताळा आला. त्यांच्या वडिलांचा मृत्यू होताच वडिलोपार्जित संपत्ती आणि मालमत्तेच्या वाटण्या झाल्या. अमीनभाईंची उधळपट्टीची वृत्ती कायम राहिल्याने मिळालेल्या पैशाला बारा वाटा फुटल्या. एक दिवस अमीनभाईंची मालमत्ता विकली गेली आणि त्यांचा झोका श्रीमंतीकडून गरीबीकडे वळला.

अमीनभाई कंगाल झाल्याचे समजताच त्यांचे भोजनभाऊ मित्र सर्वप्रथम पसार झाले. बालमित्रांना भीती पडली, की अमीनभाई आता जुन्या मैत्रीचा वास्ता देऊन उधार मागणार. अखेर तसेच घडले. एकीकडे रोजखर्चाच्या विवंचनेत असलेल्या अमीनभाईंना दुर्दैवाने पायाचा कर्करोग झाला. त्यावर उपचारासाठी त्यांच्याकडे पैसाच नव्हता. लाचार होऊन अखेर त्यांनी सर्व मित्रांपुढे हात पसरला, पण त्यातील फार थोडे खाल्ल्या मिठाला जागणारे निघाले. त्यांच्या थोड्याफार मदतीमुळे अमीनभाईंच्या रोगावर निदान उपचार होऊ शकले, मात्र अमीनभाईंना पूर्वीचे वैभवाचे दिवस पुन्हा कधीही प्राप्त झाले नाहीत.

‘असतील शिते तर जमतील भुते’, या म्हणीचा पडताळा मला कारकीर्दीच्या सुरवातीलाच आला होता. एकदा मी दुबईहून मुंबईला विमानाने येत होतो. शेजारच्या सीटवरील प्रवाशाने गप्पांच्या ओघात विचारले, “तू घरच्यांसाठी किंवा मित्रांसाठी दुबईतून काही वस्तू बरोबर नेत नाहीयस का?” मी नाही म्हटल्यावर तो आश्चर्यचकित झाला कारण त्या काळात दुबईहून भारतात येणारा माणूस कधीही रिकाम्या हाताने यायचा नाही. त्या माणसाने कारण विचारल्यावर मी स्पष्टपणे सांगितले, “माझ्या घरच्यांना सोने, तलम कपडे, पर्फ्युम, घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे आकर्षण नाही. माझे निवडकच मित्र असून तेही निरपेक्ष आहेत.” हे ऐकताच तो माणूस कौतुकाने उद्गारला, “मुलाऽ तू सुखी आहेस, अन्यथा तुझ्यावरही माझ्यासारखी वेळ आली असती.” मग त्याने स्वतःची कहाणी सांगितली.

हा माणूस दुबईत नोकरीला असताना सुरवातीला वर्षातून एकदा गावी जायचा तेव्हा सर्वांसाठी आठवणीने काही ना काही वस्तू घेऊन जायचा. हळूहळू लोक त्याला गृहित धरुन दरखेपेस त्याच्या घरच्यांकडे नवनव्या वस्तू, दागिने आणण्याच्या मागण्या आग्रहाने नोंदवू लागले. परदेशातील नोकरीमुळे त्याच्याकडे बख्खळ पैसा असणार, असा समज पसरल्याने तो गावाकडे येताच त्याच्याकडून उधार-उसनवारी, मेजवान्या, गावातल्या सार्वजनिक समारंभासाठी वर्गणी उकळण्याचे प्रकार होऊ लागले. काही वर्षांनी या डोकेदुखीला कंटाळून अखेर सुटका करुन घेण्यासाठी त्याने एक नाटक रचले. दुबईतील नोकरी गेल्याने आता आपण मुंबईत राहून मोलमजुरी करत असल्याचे त्याने कुटुंबियांना सर्वांना सांगायला लावले.

गरीबीचे सोंग खरे वाटावे म्हणून हा माणूस मुंबईत उतरताच वेशांतर करायचा. विमानतळाबाहेर येताच अंगावर स्वस्तातले शर्ट-पँट चढवायचा, सोबत आणलेल्या वस्तूंचे पॅकिंग फोडून त्यांचे एक बोचके बांधायचा आणि तेही जवळ न बाळगता पाठीमागून येणाऱ्या मित्राला घरी पोचवायला सांगायचा. स्वतः केवळ जुन्या कपड्यांची पिशवी घेऊन गावी जायचा. नोकरी नसल्याची सबब सांगून भेटेल त्याकडे उधारी-उसनवारीसाठी हात पसरायचा. ते बघून लोकांची खात्री पटली, की याच्याकडे खरोखर पूर्वीची श्रीमंती उरलेली नाही. मग मात्र त्यांनी त्याला टाळणे सुरु केले. लोकांचा पिच्छा टाळण्यासाठी त्याला ते नाटक दरखेपेस वठवावे लागत होते. म्हणून तो मला सुखी समजत होता.

मित्रांनो! पैशांची किमया सांगणारे एक सुभाषित आहे.

यस्यार्थस्तस्य मित्राणि, यस्यार्थस्तस्य बांधवाः।

यस्यार्थः स पुमाँन् लोके, यस्यार्थः स हि पंडितः॥

(अर्थ – ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचेच लोक मित्र होतात, त्याला भाऊ मानतात आणि तोच उत्तम पुरुष आणि विद्वान समजला जातो.)

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

Whats_app_banner