मिडास राजाची गोष्ट बहुतेकांनी वाचलेली असेल. फ्रिजिया देशाचा राजा मिडास ऐश्वर्यसंपन्न असुनही त्याला आणखी श्रीमंतीचा विशेषतः सोन्याचा लोभ असतो. मिडासने डायोनिसस देवाच्या सहकाऱ्याला केलेल्या मदतीमुळे संतुष्ट होऊन डायोनिसस मिडासला वरदान देऊ करतो. ही संधी साधून मिडास त्याच्याकडे ‘मी हात लावेल त्याचे सोने व्हावे’, असे वरदान मागतो. त्यावर डायोनिसस मिडासला ‘तुझ्या मागणीचा फेरविचार कर’, असे बजावतो, परंतु लोभांध मिडासला तो इशारा उमगत नाही. अखेर नाईलाजाने डायोनिसस मिडासची इच्छापूर्ती करतो.
त्यानंतर मिडास हात लावेल ते सर्व सोन्याचे व्हायला लागते. मिडास प्रथम हरखतो, पण लवकरच त्याला पश्चात्ताप होतो. जेवताना थाळ्याला हात लावल्यावर जेवण सोन्याचे झाल्याने मिडासला ते खाता येत नाही. पदार्थ भरवायलाही सेवकाची गरज भासू लागते. एक दिवस मिडासची लाडकी मुलगी मारिगोल्ड धावत येऊन त्याला बिलगते. मिडास मायेने तिला जवळ घेतो पण त्याचा हात लागताच मुलीचे रुपांतरही सोन्याच्या पुतळ्यात होते. मिडासच्या आयुष्यात अंधार पसरतो. ही त्याची स्थिती समजताच डायोनिसस देवाला दया येते आणि तो मिडासला पॅक्टोलस नदीमध्ये हात स्वच्छ धुण्यास सांगतो. मिडासने तसे करताच त्याच्या हातातून सगळे सोने नदीच्या काठावर सांडते आणि स्वच्छ हातांनी राजवाड्यात परतल्यावर त्याला त्याची मुलगीही पूर्वीसारखी मनुष्यरुपात लाभते. मानवी आयुष्यातील सर्व सुखे पुन्हा लाभल्याने मिडासच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलतो. यातून धडा घेऊन हा राजा पूर्ण बदलतो. लोभी वृत्ती टाकून देऊन आपल्या संपत्तीचा विनियोग प्रजेच्या कल्याणासाठी करतो.
मी ही कहाणी एवढ्यासाठीच सविस्तर सांगितली कारण आयुष्याच्या एका टप्प्यावर माझ्याही वाट्याला मिडासचे दुःख आले होते. मीही पैसा, यश यांच्यामागे बेभान होऊन धावत होतो. त्यातून संपत्ती मिळाली, पण माझे आरोग्य मात्र हरपले. मला नेहमीचे जेवणही जेवता येत नव्हते. पथ्यामुळे मी तब्बल पाच वर्षे रोजच्या जेवणात कोंड्याची चपाती, हळद-मीठ घालून उकडलेल्या भाज्या आणि काही फळांचे तुकडे इतकेच पदार्थ खाऊ शकत होतो. त्या काळात एकदा आमच्या परिचितांपैकी एक महिला आमच्या घरी आल्या असता माझ्या जेवणातील अगदी साधे व मसालारहित पदार्थ बघून त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, “दातार, तुम्ही एका उद्योग समूहाचे मालक आहात. तुम्हाला पैशाला काही कमी नाही तरी हे गरीबाचे जेवण जेवता, यावर विश्वासच बसत नाही.” मी त्यावर गंमतीने त्या बाईंना म्हणालो, “ताई, श्रीमंत झालो म्हणून काय जेवणातही सोने-मोती खाऊ का? गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाच्या पोटाची भूक अखेर साध्या अन्नानेच भागते.”
मिडास राजाप्रमाणेच माझे आयुष्य दुःखमय झाले असताना आणि वेदना, चिंता, नैराश्य, घृणा अशा भावनांनी मला घेरले असताना परमेश्वराने मला जीवन नव्याने सुरू करण्याची आणखी एक संधी दिली. समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात सांगितलेल्या ‘नको रे मना लोभ हा अंगीकारु’ या इशाऱ्याला अनुसरुन मी पैशाचा पाठलाग करण्याचे थांबवले, व्यवसायाला आणि आयुष्याला एक शिस्त आखून घेतली. जीवनशैली, व्यायाम, आहार, निद्रा यांचे वेळापत्रक पाळू लागलो. समाजाभिमुख होऊन सामाजिक कार्यक्रमांत मिसळू लागलो, कष्टाने व प्रामाणिकपणाने मिळवलेल्या पैशांतून गरजूंना मदत करु लागलो. कुटुंबाला वेळ देऊ लागलो. या बदलाचा परिणाम म्हणून माझे आरोग्य मला परत मिळाले आणि हव्यास सोडला तशी जीवनातील सुखेही परत आली.
मित्रांनो! निश्चय केल्यास आपण नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो. हा आनंदाचा झरा झुळझळता ठेवायचा असेल तर हावरटपणा दूर ठेवायला हवा. लिओ टॉलस्टॉयची एक कथा आहे. अधिकाधिक जमीन मिळवण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड पळत राहणारा एक शेतकरी कुठे थांबायचे हे न समजल्याने अखेर उर फुटून मरण पावतो आणि शेकडो एकर जमिनीची हाव धरणाऱ्या त्याच्या वाट्याला अखेर देह पुरण्याची केवळ साडेतीन हात जागा येते. पैशाचा अखंड पाठलाग केला पण त्यातून आनंद, सुख, समाधान मिळणार नसेल तर मग साहजिकच प्रश्न येतो, की कशासाठी आपण धावत राहिलो? एक संस्कृत सुभाषित आहे.
लोभ मूलानि पापानि संकटानि तथैव च।
लोभात्वप्रवर्तते वैरं अतिलोभात्विनश्यती॥
(लोभ हे पापाचे आणि संकटाचे मूळ आहे. लोभामुळे वैर निर्माण होते तर अतिलोभामुळे नाश होतो)
(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
संबंधित बातम्या