देशाटन आपली दृष्टी व्यापक बनवते आणि आपल्याला अनुभवसंपन्न बनवते, याबाबत माझ्या मनात शंका नाही. म्हणूनच ज्यांना शिक्षण-नोकरी-व्यवसाय किंवा पर्यटनाची संधी मिळेल त्यांनी परदेशांमध्ये अवश्य जाऊन तेथील समाजांचे सूक्ष्म निरीक्षण करावे, त्यांच्यात मिसळावे, त्यांच्यातील चांगले गुण आत्मसात करावेत, असे मी आवर्जून सांगतो.
मी व माझी पत्नी सिंगापूरमध्ये सहलीला गेलो असताना एका हॉटेलमध्ये उतरलो होतो. आजूबाजूच्या खोल्यांमध्ये विविध देशांतून आलेले पर्यटक होते. एकमेकांची भाषा समजत नसली तरी इंग्रजी भाषेचा आधार घेऊन आम्ही चार दिवसांत चांगली ओळख प्रस्थापित केली होती. एक दिवस रात्रीचे भोजन आटोपल्यावर मी आणि माझी पत्नी हॉटेलजवळच्या रस्त्यावर फेरफटका मारायला गेलो होतो. गप्पांच्या नादात आम्ही हॉटेलपासून थोड्या अंतरावर आलो तर तेथे पोलिसांची तपासणी चालू होती. ते बघताच माझ्या काळजात धस्स झाले कारण आम्ही आमचे पासपोर्ट हॉटेलच्या खोलीत विसरुन आलो होतो. परदेशात पोलिसांनी चौकशी केल्यावर तुमचे पासपोर्ट जवळ नसतील तर कटकटीचा प्रसंग ओढवतो. मी त्या पोलिस अधिकाऱ्याला खरे ते सांगितले. त्यावर तो आणखी काही प्रश्न विचारु लागला. त्याचवेळी आमच्या हॉटेलमधील सहप्रवासी त्यांचे भोजन आटोपून हॉटेलकडे निघाले होते. आम्हाला पोलिस काहीतरी विचारताहेत हे पाहिल्यावर त्यांच्या लक्षात तो प्रकार आला. त्यांनी तत्परतेने पुढे होऊन स्वतःचे पासपोर्ट दाखवले आणि आम्ही त्यांच्याच हॉटेलमध्ये राहात असल्याची पुस्ती जोडली. पोलिसांनीही आम्हाला फार काही न विचारता जाऊ दिले. ‘आपण भले तर जग भले’ या म्हणीचा अनुभव मला अनेकदा आला आहे.
मी दुबईत भारतीय व विशेषतः मराठी संस्कृतीचे जतन करण्यास प्रयत्नशील आहे. यापाठीमागेही परदेशातील एक अनुभवच कारणीभूत आहे. एकदा मी पत्नीसह इटलीमध्ये सहलीसाठी गेलो होतो. दिवसभर फिरल्यानंतर सायंकाळी आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पायी परत चाललो होतो. भूक लागली होती म्हणून आम्ही आसपास एखादे रेस्टॉरंट शोधू लागलो, पण उशीर झालेला असल्याने बहुतेक रेस्टॉरंट बंद झालेली दिसली. अशाच एका बंद रेस्टॉरंटच्या समोर उभ्या वृद्ध दांपत्याला आम्ही विचारले, की “येथे जवळपास खाण्याची सोय असलेले ठिकाण आहे का?” त्यांनी आम्हाला विचारले, “तुम्ही कुठून आलात?” आम्ही भारतीय पर्यटक आहोत, हे समजल्यावर त्या दोघांनी माघारी वळून बंद केलेले रेस्टॉरंटचे शटर उघडले. ते रेस्टॉरंट ते दोघेच चालवत होते आणि रोजच्या वेळेप्रमाणे बंद करुन घरी चालले होते. त्या इटालियन गृहिणीने झटपट करता येण्यासारख्या डिश बनवून पंधरा मिनिटांत आम्हाला खाऊ घातले. जाताना आम्ही त्यांचे आभार मानू लागलो त्यावर ते म्हणाले, “तुम्ही इतक्या लांबून आमचा देश बघायला आलात तर तुम्हाला येथे थोडेसेही खायलाही मिळू नये? आमच्या देशात आलेल्या पाहुण्यांना एक वेळही उपाशी राहायला लागणे, हा आम्ही आमचा राष्ट्रीय अपमान समजतो. आम्ही फार काही केले नाही. तुमचे आतिथ्य करणे आमचे कर्तव्यच होते.”
परदेशी लोकांपुढे आपल्या देशाचा मान-सन्मान आणि संस्कृती कशी जपावी, याचे आदर्श उदाहरण मी त्या दिवशी बघितले. जपानमध्येही मला तेथील नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाचा अनुभव आला होता. मी व्यावसायिक कारणासाठी तेथे गेलो होतो. कामातून मोकळा वेळ मिळताच तेथील स्थळदर्शन करण्याचे ठरवले. तेथे एक अर्ध्या तासाची हेलिकॉप्टर राईड असते. मी त्यासाठी बुकिंग करायला गेलो. तेव्हा तेथील स्वागतिकेने मला सांगितले, की दुसऱ्या दिवशी दुपारची राईड मी घेऊ नये कारण पाऊस पडण्याचा इशारा त्यांच्या हवामान खात्याने दिला आहे. मी तिला अशा अंदाजांची अनिश्चितता पटवून देऊ लागलो, पण तिचा आपल्या देशाच्या संस्थेवर आणि तंत्रज्ञानावर ठाम विश्वास होता. तिच्या शब्दावर विसंबून मी निर्णय रद्द केला आणि खरोखर दुसऱ्या दिवशी दुपारी पाऊस पडू लागल्याने ती राईड रद्द झाली. मला त्याचे फार कौतुक वाटले.
भारतीयांनी जगभर जाऊन तेथील विविध समुदायांशी मैत्री वाढवावी आणि आपल्या देशाची शान वाढवणारी कामगिरी करावी, असे मला वाटते. ‘एखाद्या देशाची संस्कृती तेथील नागरिकांच्या अंतःकरणात वसत असते,’ असे महात्मा गांधी म्हणत असत. ते सत्यच आहे.
मित्रांनो! देशाटनाचे लाभ सांगणारे एक छान सुवचन अनुकरणीय आहे.
केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार।
शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार॥