Business Ideas : उद्योग-व्यवसायात पैशांइतकाच वेळ मूल्यवान. जाणून घ्या वेळेचे महत्व
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : उद्योग-व्यवसायात पैशांइतकाच वेळ मूल्यवान. जाणून घ्या वेळेचे महत्व

Business Ideas : उद्योग-व्यवसायात पैशांइतकाच वेळ मूल्यवान. जाणून घ्या वेळेचे महत्व

HT Marathi Desk HT Marathi
Aug 02, 2024 05:54 PM IST

Time is money in business success: कोणताही निर्णय उतावीळपणे न घेता विचारपूर्वक आणि शांतपणे घ्यावा, हे तत्त्व पटण्याजोगे असले तरी, त्यालाही अपवाद आहे. काही प्रसंगच असे असतात, की तेथे निर्णय घेताना वेळ गमावून चालत नाही.

उद्योग व्यवसायांत वेळेचे महत्व जाणा
उद्योग व्यवसायांत वेळेचे महत्व जाणा

 

धनंजय दातार

संयुक्त अरब अमिरातीपाठोपाठ (युएई) अन्य आखाती देशांत अदील सुपर स्टोअर्सची साखळी वाढू लागली, तसतशा आमच्याकडे व्यवसायाच्या नव्या संधी चालून येऊ लागल्या. वैयक्तिक ग्राहकांप्रमाणेच प्रामुख्याने हॉटेल्स, हॉस्पिटल्स, केटरिंग कंपन्या आदींकडून घाऊक मालपुरवठा करण्याबाबत विचारणा होऊ लागली. रोजच्या रोज वस्तू वापरुन संपतात, अशा ठिकाणी कच्च्या मालाचा पुरवठा त्वरित आणि सातत्यपूर्ण होण्याची गरज असते. त्यामुळे अशा संस्था तात्पुरत्या खरेदीपेक्षा लाँग टर्म काँट्रॅक्ट करण्याला प्राधान्य देतात. हे लोक माझ्याकडे तत्काळ करारावर सह्या करण्याबाबत आग्रह धरत. मी मात्र सवयीप्रमाणे त्यांना ‘विचार करुन सांगतो’, असे म्हणायचो. नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात येऊ लागली, की ज्या वेळेस मी हे शब्द उच्चारायचो, त्यावेळेस नेमके ते कंत्राट हातून जायचे.

एकदा असेच एक कंत्राट हातचे गेल्यानंतर मी त्या कंपनीच्या प्रमुखांकडे माझे काय चुकले, अशी विचारणा केली. तेव्हा ते म्हणाले, “दातार साहेब, काही व्यवसाय असे असतात ज्यांची अवस्था ‘ॲलिस इन वंडरलँड’ कादंबरीतील एका पात्रासारखी असते. हातात भाकरी घेऊन खात-खात पळणाऱ्या माणसाला छोटी ॲलिस विचारते, “तू एका जागी उभा राहून शांतपणे भाकरी का खात नाहीस? त्यावर तो उत्तर देतो, ‘मला भाकरी मिळवण्यासाठी पळावे लागतेच पण ती थांबून खाण्याइतकाही वेळ माझ्याकडे नाही.’ आमचेही तसेच आहे. तुम्ही पुरवठा करण्याचा विचार करण्यासाठी हवा तितका वेळ घेऊ शकता, पण आम्हाला मात्र ‘जस्ट इन टाईम इन्व्हेन्टरी’ हे तंत्र पाळावेच लागते. वेळेत कच्च्या मालाचा पुरवठा झाला नाही तर आमच्या उत्पादनाची पुढची साखळी कोलमडते.”

मला तेव्हा समजले, की प्रत्येक परिस्थितीत ‘थंडा करके खानेका’ हा मंत्र वापरता येत नाही. उत्पादनाची खरेदी (प्रॉडक्ट बाईंग) अथवा माल पुरवठ्याचा करार (सप्लाय काँट्रॅक्ट) असे व्यवहार फार काळ लोंबकळत ठेऊन चालत नाहीत. पण तेच एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल तर निर्णय उतावीळपणे नव्हे तर विचारपूर्वक घ्यायचा असतो. व्यवसायात वेगवान निर्णय कधी आणि कसा घ्यावा, याचा एक आडाखा आहे. तुमच्यासमोर पुरवठ्याची संधी येईल त्याचवेळी त्यातील फायद्याची आकडेमोड मनात करुन ठेवा. ‘विचार करुन सांगतो’ असे म्हणण्यापेक्षा ‘तुम्हाला इमिजिएट उद्याच कळवतो’, असे चतुराईने सांगितलेत तर दोन फायदे होतात. एकतर तुम्हाला विचार करायला एक दिवस जादा मिळतो आणि तुम्ही तत्पर असल्याची प्रतिमाही समोरच्याच्या मनात निर्माण होते.

वेळेचा विषय निघाला आहे म्हणून सांगतो, की व्यावसायिकाला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही वेळेची किंमत समजली पाहिजे. धंद्यात टाईमपास नसतो. काही वर्षांपूर्वी मी मुंबईत एका गृहस्थांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. आम्ही बोलत असताना तेथे एक सेल्समन आला. त्या गृहस्थांनी अर्धा-पाऊण तास त्याला विविध प्रश्न, शंका विचारण्यात घालवला. त्या सेल्समनने काही समजावून देण्याचा प्रयत्न केला, की हे गृहस्थ त्यावर उलट टिप्पणी करुन संभाषण लांबवायचे. शेवटी कंटाळून तो सेल्समन निघून गेला.

मला तो प्रकार विचित्र वाटला. या गृहस्थांना उत्पादन घ्यायचे नव्हते तर त्यांनी त्या सेल्समनला प्रथमच तसे सांगायचे होते. विनाकारण स्वतःचा आणि त्याचाही वेळ कशाला वाया घालवायचा? मी तसे विचारले असता ते शांतपणे म्हणाले, ‘या कंपन्या आणि त्यांचे सेल्समन आम्हाला त्यांचे उत्पादन नको असताना विनाकारण गळेपडूपणा करुन ग्राहकांचा वेळ वाया घालवतात म्हणून मीही त्यांच्याबाबत तसेच करतो.’

कोणताही व्यवसाय असो, ग्राहकाला उत्पादन खरेदीत खरोखर रस आहे, की नाही, हे विक्रेत्याने प्रथमच ओळखायचे असते. त्याचा साधासा ठोकताळा म्हणजे सकारात्मक ग्राहक दुसऱ्याचे बोलणे आधी लक्षपूर्वक ऐकतात आणि नंतर शंका विचारतात. याउलट टाईमपास करणारे लोक संभाषणात मध्येच तक्रारी किंवा मतप्रदर्शन करु लागतात. सेल्समनने अशा लोकांपासून सावध राहायचे असते. ते संभाव्य ग्राहक (पोटेन्शियल कस्टमर) नसल्याने त्यांच्यावर वेळ घालवण्यात शहाणपण नसते.

हे वाचा: Business Ideas स्तंभातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो, ‘टाईम इज मनी,’ ही म्हण मुळीच खोटी नाही. वेळ पैशाइतकाच मूल्यवान असतो. आपण आपला वेळ वाया घालवू नये आणि दुसऱ्याचाही. प्रत्येक क्षणाला महत्त्व असते, हे सांगताना समर्थ रामदास म्हणतात...

ऐक सदैवपणाचे लक्षण। रिकामा जाऊ नेदी एक क्षण। 
प्रपंच व्यवसायाचे ज्ञान। बरे पाहे॥

 

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

Whats_app_banner