Business Ideas : 'जात कोणती पुसू नका... जात-धर्म दूर ठेवल्यानेच धंद्यात यशस्वी झालो'-business ideas rising above caste and religion in business ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : 'जात कोणती पुसू नका... जात-धर्म दूर ठेवल्यानेच धंद्यात यशस्वी झालो'

Business Ideas : 'जात कोणती पुसू नका... जात-धर्म दूर ठेवल्यानेच धंद्यात यशस्वी झालो'

HT Marathi Desk HT Marathi
May 30, 2024 09:48 AM IST

Business Ideas : मला माझ्या आयुष्यात जात-धर्माचा कधीच उपयोग झालेला नाही त्यामुळे ‘जातीसाठी खावी माती’ अशा म्हणींवर माझा विश्वास नाही. उलट कवी वसंत बापट यांच्या कवितेतील ‘जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलांस त्यांचा रंग कोणता पुसू नका.’ या ओळी मला आवडतात.

जात-धर्म दूर ठेवल्यानेच धंद्यात यशस्वी होता येते
जात-धर्म दूर ठेवल्यानेच धंद्यात यशस्वी होता येते

 

धनंजय दातार

अमरावती जिल्ह्यातील शिरखेडसारख्या छोट्या खेड्यात माझे बालपण गेले. शाळेत आम्ही मित्रांनी कधी एकमेकांच्या जाती विचारल्या नाहीत किंवा गावातील लोकही इतरांच्या जाती लक्षात ठेवण्याची उठाठेव करणारे नव्हते. आम्ही सगळेच गरीब होतो. माध्यमिक शिक्षणासाठी मी मुंबईत दाखल झालो. बाबा हवाई दलात नोकरीला असल्याने आम्ही मुंबईत कलिना उपनगरात मिलिटरी क्वार्टर्समध्ये राहायचो. तेथे तर भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमधील लोक आम्हाला शेजारी म्हणून लाभले. त्यामुळे आपोआपच राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार होऊन ‘एक भारतीय’ हीच माझी ओळख बनली.

मी दुबईत गेलो तेव्हाही मला तेथे विविध जाती-धर्माच्या लोकांकडून आपुलकीने मदत झाली. आमच्या दुकानांचे ग्राहक मराठी, पंजाबी, गुजराथी, सिंधी, केरळी, तमीळ होतेच, पण स्थानिक अरबी आणि पाश्चिमात्य देशांतीलही होते. या सगळ्यांकडून मला खूप मदत मिळाली. अनेकांनी आपापल्या प्रांतातील उत्तम उत्पादने भारतातून परत येताना दुकानात विक्रीला ठेवण्यासाठी अगत्याने आणून दिली होती. सुरवातीला मला अरबी भाषा येत नव्हती तेव्हा माझा भाषेचा न्यूनगंड एका अरबी ग्राहकानेच दूर केला. आमचा धंदा अडचणीत असताना मला नफ्याची पहिली संधी देणारे चाचा हे व्यापारी बांगलादेशी होते, तर पहिली मोठी ऑर्डर मिळाल्यावर केवळ त्या पत्राच्या आधारे खरेदीसाठी कर्ज देणारा बँकेचा व्यवस्थापक शेजारी देशातील होता. मला नैराश्यातून बाहेर काढणारी वृद्ध डॉक्टर एक ब्रिटीश होती. मला पाठदुखीच्या वेदनेतून ॲक्युपंक्चर उपचारांनी बरे करणारा एक चिनी माणूस होता. या सगळ्यांनी कधी माझा धर्म आणि देशही चुकून विचारला नाही. आमच्या कर्मचारी वर्गात विविध प्रांतांचे लोक आहेत. मी कधी कुणाला हा आपल्या जातीचा-धर्माचा-देशाचा माणूस या निकषावर रोजगार दिला नाही.

व्यावसायिकाने आपली जात-धर्म किंवा वैयक्तिक आवडी घरी ठेवाव्यात, त्या दुकानात आणू नयेत, हा मोलाचा उपदेश मला एका पंजाबी जैन व्यावसायिकाने केला होता. तसेही व्यवसाय हे असे खुले क्षेत्र आहे जेथे प्रवेशासाठी जात-धर्म-प्रांत-देश-शिक्षण-आर्थिक स्तर अशा कोणत्याही अटी नसतात आणि यशासाठी केवळ कष्ट, चिकाटी, कल्पकता आणि सौजन्य या गुणांची गरज असते. व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या एका समाजातील एक माणूस आमच्या दुकानात कामाला होता आणि त्याला त्याच्या जातीचा गर्वही होता. तो माझ्याशी बोलताना नेहमी तिरसकपणे म्हणायचा, की “व्यापार-धंदा करावा तो आमच्या लोकांनीच. इतरांचे ते काम नाही.” मला त्याच्या त्या गर्विष्ठपणाचे हसू येत असे. “तुमच्या समाजाचे लोक जर व्यापारात इतके निष्णात असतील तर मग तुम्ही आमच्या दुकानात नोकरी का करताय?” असा प्रश्न माझ्या जिभेवर येत असे, परंतु वाद घालण्याचा माझा स्वभाव नसल्याने मी त्याचे ते शेरे कानाआड करत असे. पुढे या माणसाने नोकरी सोडून व्यापारात पदार्पण केले, पण तेथे तो अयशस्वी ठरला. माणूस जातीच्या आधारावर नव्हे, तर कष्ट आणि गुणवत्तेने यशस्वी होतो, हा माझा आडाखा अगदी अचूक ठरला.

अर्थात आपण स्वतः जातनिरपेक्ष असलो तरी इतर लोक तसा विचार करतीलच असे नव्हे. आमच्या दुकानात एकदा एक महिला बराच वेळ थांबून प्रत्येक वस्तूच्या पाकिटावरील उत्पादक कंपनीची माहिती बारकाईने वाचून बघत होती. मी कुतूहलाने तिला त्याचे कारण विचारले त्यावर ती स्पष्टपणे म्हणाली, “मला एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी बनवलेली उत्पादनेच पाहिजे असल्याने मी आधी कंपनीचे नाव वाचून बघते आहे.” तिच्या उत्तराने मला धक्का बसला. मी तिला शांतपणे समजावले, “ताई, तुम्ही चुकीचा विचार करताय. पोटाला जात नसते. जगातील हजारो कंपन्यांत वेगवेगळ्या जाती-धर्म-पंथांचे कामगार काम करतात. ते कष्ट करुन उत्पादने बनवतात ते ग्राहकाचा धर्म बघून नव्हे तर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी. वेगळे उदाहरण देऊन विचारतो, तुम्ही आजारी पडलात तर आधी बरे व्हायला प्राधान्य द्याल, की आधी डॉक्टरचा धर्म किंवा औषध विक्रेत्याची जात बघत बसाल?” या प्रश्नावर ती महिला निरुत्तर झाली. तिला आपल्या विचारातील चूक लक्षात आली आणि जाताना मला शुभेच्छा देऊन गेली.

मित्रांनो! एक छान संस्कृत सुभाषित आहे.

अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम।

उदार चरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥

(अर्थ – हलक्या मनोवृत्तीची व्यक्ती ‘हा माझा, तो परका’ असा भेद-भाव करते, परंतु विशाल मनाचा माणूस सर्व जगालाच आपले कुटूंब मानतो.)

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

 

Whats_app_banner