काही वर्षांपूर्वी मला माझा एक मित्र भेटला. एका बड्या कंपनीत उच्चाधिकारी राहिलेल्या माझ्या मित्राने मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली होती. पण आता रिकामा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्याला सतावत होता. त्याने सल्ला विचारताच मी म्हणालो, “अरे, हातात भरपूर वेळ असणे, ही सुखाचीच गोष्ट असते. तू मनात राहून गेलेले छंद जोपासू शकतोस. संगीत आवडत असेल तर एखादे वाद्य वाजवायला किंवा गायन शिकायला जात जा. पर्यटन आवडत असेल तर पत्नीला सोबत घेऊन देश-परदेशात भटकून ये. तू आयुष्यभर नोकरी केली आहेस तर बदल म्हणून एखादा लहानसा व्यवसाय सुरु कर. एकंदर मनाला गुंतवणारे काहीही तू कर.”
यावर तो निराशेने म्हणाला, “मला यातले काहीच जमणार नाही. मी नोकरीत असतानाच बहुतेक देश बघितले आहेत. या वयात गायन-वादन शिकणे जमणार नाही. व्यवसायाचे कौशल्यही माझ्या अंगी नाही. या सर्व गोष्टी उमेदीच्या काळात करायच्या असतात. नवे शिकण्यासाठी खूप उशीर झाला आहे.” त्यावर मी इतकेच म्हणालो, “आयुष्यात उशीर झालाय असे म्हणून आपण कुठल्याही आनंदाचे महत्त्व कमी करुन घेऊ नये.” हे सांगताना माझे मन भूतकाळात गेले.
मला आयुष्यातील पहिला पुरस्कार व्यावसायिक गुणवत्तेसाठी वर्ष २००३ मध्ये मिळाला. तोपर्यंत आपला सन्मान होईल अशी अपेक्षा मी कधीही बाळगलेली नव्हती. शाळेत असताना अभ्यासातच नव्हे, तर कोणत्याही कलेत किंवा अगदी खेळांतही माझी कामगिरी साधारणच राहिली. पुढे मी ज्या व्यवसायात पडलो त्या किराणा दुकानदारीसाठी पारितोषिक मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. तरीही एका वळणावर पुरस्कारच माझी वाट बघत होता.
पुरस्कार समारंभाच्या ठिकाणी पोचल्यावर मी बावरुन गेलो. संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) उद्योग वर्तुळातील बड्या असामी तेथे उपस्थित होत्या. समारंभ बराच लांबला. वेगवेगळ्या श्रेणींसाठी अनेकांना पुरस्कार दिले जात होते. माझे नाव केव्हा जाहीर होते, याची वाट बघत मी बसून होतो. हळूहळू त्या वातावरणाचा कंटाळा यायला लागला. सहज मागे वळून बघितले तर प्रेक्षकांची संख्याही तुरळक होती. माझ्या मनात निराशा दाटून आली. आयुष्यात सगळ्याच गोष्टी उशिरा घडल्या होत्या. दुबईला जाण्याचे स्वप्न बघितले. ती वेळ पाच वर्षे उशीराने आली. दुकानात कष्ट केले, पण जबाबदारी दहा वर्षे उशिरा मिळाली. पुरस्कार मिळायला तब्बल १८ वर्षे जावी लागली आणि आताही तो हातात पडायला इतका उशीर होत होता, की बहुधा सगळ्यात शेवटचा क्रमांक माझा असणार, या विचाराने मी खिन्न झालो होतो.
पण त्याचवेळी मला लहानपणीची एक आठवण आली. नात्यात किंवा परिचितांकडे कार्यासाठी आमंत्रण असेल तर तेथे गेल्यावर माझी आई कधीच पहिल्या पंगतीला जेवत नसे. ती आम्हा भावंडांना जेऊ घालायची आणि स्वतः घरच्या गृहिणीला मदत करत तिच्याबरोबर शेवटच्या पंगतीपर्यंत थांबून राहायची. मी एकदा विचारले, की ‘आईऽ तू नेहमी शेवटच्या पंगतीला जेवतेस. आपल्याला उशिरा जेवायला लागतंय असे तुला वाटत नाही का?’ त्यावर आई म्हणाली, ‘दादा! ज्यांना गडबड असते असे लोक पहिल्या पंगतीला बसतात, पण जी गृहिणी स्वयंपाकघरात राबून सर्वांना पोटभर जेऊ घालते त्या अन्नपूर्णेच्या पंगतीला बसण्याचा मान आणि पुण्य काही वेगळेच असते. लवकर किंवा उशीरा असा विचार न करता मनात समाधान ठेवले तर आयुष्य आनंदी होते.’
आईचे ते शब्द आठवल्यावर माझ्या मनातील खळबळ निघून गेली. मी एकदम शांत झालो. कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी काही क्षण माझे नाव पुकारले गेले. मी स्टेजकडे जात असताना निवेदक माझा परिचय आणि वाटचालीचे टप्पे वाचून दाखवत होता. स्टेजवर दुबईच्या राजेसाहेबांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यावर मी सहज वळून बघितले तर सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते आणि टाळ्यांचा कडकडाट सुरु होता.
या प्रसंगानंतर मी अगदी आजवर कधीही मनात खिन्नतेला थारा दिला नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन्’ या वचनाला अनुसरुन मी फळाची अपेक्षा न बाळगता माझे काम करत राहतो. प्रत्येक गोष्ट झटपट मिळाली पाहिजे, असा हट्ट धरुन बसले तर उतावीळ वृत्ती आणि चिंता निर्माण होते. त्यापेक्षा ‘चित्ती असो द्यावे समाधान’ या शिकवणुकीला अनुसरुन वागले तर आपण जीवनातील प्रत्येक क्षणाचा भरभरुन आनंद घेऊ शकतो.
(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)