मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका...

Business Ideas : पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका...

HT Marathi Desk HT Marathi
Feb 29, 2024 06:49 PM IST

व्यवसायाला सुरवात केल्यावर कितीही अडचणी आल्या तरी निराश होऊन बाहेर पडू नये. हिंदीत एक म्हण आहे, की ‘सब दिन जात न एक समान’ (सगळेच दिवस सारखे नसतात). अगदी सुरवातीलाच नुकसान झाल्याने पराभूत मनोवृत्तीने मी धंद्यातून बाहेर पडण्याच्या विचारात होतो…

Business Ideas: उद्योगधंदात पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका
Business Ideas: उद्योगधंदात पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका

धनंजय दातार

(व्यवस्थापकीय संचालक, अदिल ग्रूप)

माझ्या बाबांनी दुबईत धाडसाने दुकान थाटले तेव्हा त्यांना धंद्याचा काहीही पूर्वानुभव नव्हता आणि त्यांना मदतीसाठी म्हणून गेलेला मीही विशीचा नवखा तरुण होतो. आम्हाला जवळपास कुणी मार्गदर्शकही नव्हता. बाबांची धंद्याची पद्धत अगदी साधी होती. ते आधी ग्राहकांच्या रोजच्या गरजेच्या लोणची, मसाले, चटण्या, पिठे अशा वस्तूंचा अंदाज घ्यायचे. त्यापैकी जास्त मागणीच्या वस्तू भारतातून ५० किलोच्या प्रमाणात घाऊक दरात मागवायचे. दुबईत आम्ही त्या वस्तूंचे १०० ग्रॅम, पावशेर, अर्धा किलो, एक किलो अशा विविध वजनांचे पॅक बनवून किरकोळीत विकत असू. आमचा माल निवडक, स्वच्छ आणि उत्तम दर्जाचा असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आणि दुकान चांगले चालू लागले. पण नशिबाच्या मनात काही वेगळेच होते.

पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही नफा-तोट्याचा एकंदर हिशेब मांडला तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. आम्ही पूर्ण नुकसानीत गेलो होतो. कारण, धंदा वाढवण्याच्या नादात आम्ही फार मोठी थकबाकी ओढवून घेतली होती. घडले ते असे, की दुबईत जगातील विविध समुदायांचे लोक राहतात. त्यात भारतीयांप्रमाणे इतरही आशियाई देशांतील स्थलांतरित असतात. त्यापैकी दूरवरच्या भागांत राहणारे काही लोक आमच्या दुकानातून उधारीवर माल घेऊन जात आणि त्यांच्या समाजात किरकोळीने विकत. हळूहळू या लोकांनी उधारी थकवणे सुरु केले. धंद्यात नवशिके असल्याने हा सापळा आमच्या लक्षात आला नाही.

आम्ही खूपच अडचणीत आलो. नवा माल भरायचा तर हातात पैसे नव्हते. बाबांनी नोकरीत साठवलेली सर्व पुंजी दुकानात भांडवल म्हणून गुंतवली होती. त्यांनी मित्रांकडून थोडी उसनवारी करुन बघितली, पण ती नुकसान भरुन काढण्यासाठी पुरेशी नव्हती. मी तर निराशेने बाबांना ‘आपण धंदा बंद करुन भारतात जाऊया’, असा सल्ला दिला. बाबांना मात्र पळपुटेपणा पसंत नव्हता. लष्करी प्रशिक्षणामुळे ते सहजासहजी माघार घेणाऱ्यातील नव्हते, पण उभी राहिलेली अडचणही मोठीच होती. अखेर मन घट्ट करुन बाबांनी मुंबईत आईला पत्र लिहिले आणि घरातील सर्व मौल्यवान चीजा विकून पैसे उभे करण्यास सांगितले. आईने त्याप्रमाणे घरातील फर्निचर, तिचा स्वयंपाकघरातील मदतनीस असलेला मिक्सर (त्यावेळी ती नाविन्यपूर्ण गोष्ट होती), सर्व दागिने एवढेच काय, गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रही विकले आणि ती रक्कम आम्हाला पाठवली. सोबत एक चार ओळींची चिठ्ठीही होती. त्यात लिहिले होते, की ‘या रकमेतून जमेल तेवढे नुकसान भरुन काढा, पण धंदा थांबवू नका. एकदा पुढे टाकलेले पाऊल माघारी घेऊ नका.’

ती चिठ्ठी वाचताच मी अक्षरशः हमसून रडलो. लक्ष्मीसारखी सजलेली माझी आई एका क्षणात लंकेची पार्वती झाली होती. नवरा आणि मुलगा पराभूत होऊ नयेत म्हणून तिने अलंकार विकून गळ्यात केवळ काळ्या पोतीचे मणीमंगळसूत्र ठेवले होते. आईच्या त्या स्थितप्रज्ञ आणि त्यागी वृत्तीने मला खूप मोठी प्रेरणा दिली. भावनेच्या भरात मी आईला पत्र लिहिले. त्यात म्हटले होते, की ‘प्रिय आई! बाबांचे स्वप्न असलेल्या दुकानाला वाचवण्यासाठी स्त्रीचा अनमोल दागिना असलेले सोन्याचे मंगळसूत्र काढून देतानाही तुझा हात थरथरला नाही. मी तुला वचन देतो, की मी इतके कष्ट करेन की तुझे मंगळसूत्रासह सर्व दागिने पुन्हा घडवेन आणि एक दिवस आपल्याही घरी सोन्याचा धूर निघेल.’

दुकान नफ्यात आणल्याखेरीज घरी तोंड दाखवणार नाही, असा दृढनिश्चय मी केला. त्यानंतर तीन वर्षे भारतात गेलोच नाही. दिवसाचे सोळा तास केवळ दुकानाला वाहून घेतले, पडतील ती कामे केली व मिळेल ते खाऊन राहिलो. बाबांचा स्वभाव तापट असल्याने त्यांना वसुलीसाठी न पाठवता स्वतः थकबाकीदारांच्या दारात गेलो. गोड बोलून, मिनतवाऱ्या करुन तर कधी चिकाटीने पाठपुरावा करुन अधिकाधिक थकबाकी वसूल केली. नंतर उधारीचे व्यवहार बंद करुन रोख विक्रीवर भर दिला. या कष्टाला फळ आले आणि आमचे दुकान तब्बल तीन वर्षांनी नफ्यात आले. गंगाजळी साठताच मी केलेली पहिली गोष्ट म्हणजे आईचे सोन्याच्या मंगळसूत्रासहित सर्व दागिने अगदी पहिल्यासारखे घडवून घेऊन मुंबईला गेलो. आईच्या पायावर डोके ठेऊन तिचे अलंकार तिच्या हातात ठेवले. सौभाग्यलेणे हातात घेताच आईच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि मीही गहिवरलो. आईने मायेने माझ्या गालावरुन कौतुकाने हात फिरवला. माझ्यासाठी तो सर्वाधिक आनंदाचा आणि कृतकृत्यतेचा क्षण होता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या